त्याच्या डोईवरच्या जटाच नाही तर, अंधश्रद्धेचे ओझेही उतरले...!

ज्ञानेश्वर रायते
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

मनवाणी बुद्रुक येथील अरविंदला मदतीचा हात देण्याचे आवाहन 

भवानीनगर : भाजप सरकारने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात राज्यातील एक हजार गावे निवडली, त्यात नंदुरबार जिल्ह्यातील मनवाणी बुद्रुक (ता. अक्राणी) हे एक गाव..! गावातल्या अरविंदला फिटचा त्रास होतो म्हणून अंधश्रद्धेपोटी देवीच्या नवसाने त्याच्या जटा वाढवल्या... फिट्‌सचा त्रास सोडा, जटांचे जंजाळ मात्र वाढत गेले.

सणसर (ता. इंदापूर)च्या 'श्रीरामा'ने हे अंधश्रद्धेचे भूत अरविंदच्या वडिलांच्या मनातून उतरवत त्याच्या जटा मोकळ्या केल्या... आता अरविंद खूष आहे..! 
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात सणसर (ता. इंदापूर) येथील श्रीराम रायते हा युवक ग्रामविकास कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतो.

मनवाणी गावात काम करताना त्याला काही दिवसांपूर्वी अरविंद गोसाय वळवी हा चिमुरडा भेटला. नऊ वर्षांचा तो, मात्र सात वर्षांच्या मुलाएवढीच त्याची वाढ दिसल्याने श्रीरामने चौकशी केली. गरिबी पाचवीला पुजलेल्या कुटुंबात जन्मलेल्या अरविंदला जन्मजात फिट्‌सचा त्रास होता. वडिलांनी अगदी जिल्ह्यापर्यंत दवाखाने केले. वैद्य, हकीम झाले. सगळी पुंजी संपली. अखेर देवीचा प्रकोप असेल म्हणून एका बाबाने बाळाच्या जटा वाढवायचा सल्ला दिला आणि अरविंदच्या जटा वाढल्या, अर्थात फिट्‌स थांबल्याच नाहीत. पाच वर्षांत केस एकमेकांना चिकटले. भेसूर दिसू लागल्याने मित्र नाहीत, कोपऱ्यात बसायला सांगतात, म्हणून शाळेतही जाऊ वाटत नाही. अरविंदच्या कहाणीने अस्वस्थ श्रीरामने गोसाय वळवींशी चर्चा केली. त्यांना विश्वासात घेतले. स्वतः आध्यात्मिक असल्याने त्याने देवाधर्माच्या कडेकडेने मुलाच्या भविष्याविषयी, शिक्षणाविषयी सांगत अजून जर फिट्‌स येत असतील तर देवीचा प्रकोप कसा असेल? हे त्यांना पटवले आणि वळवी यांनी 'सर, आजच जटा काढू' असे म्हटले.

दोन दिवसांपूर्वी अरविंदची जटा काढली. अरविंदला मोकळे मोकळे वाटू लागले. त्याने श्रीरामशी बोलताना 'आता शाळेत मले कोणी हाकलणार नाही' असे सांगितले, तेव्हा त्याच्या डोळ्यांतील चमक बरेच काही सांगून जात होती, साहजिकच त्याच्या जटाच निघाल्या नाहीत तर त्याच्या डोईवरचे अंधश्रद्धेचे ओझेही उतरले...! 

फिट्‌स कमी होण्यासाठी मदत पाहिजे... 
अरविंदचा फिट्‌सचा त्रास कमी करण्यासाठी मदत हवी आहे. अरविंदवर योग्य उपचार झाल्यास पुन्हा कोणी तिथे अंधश्रद्धेला बळी पडणार नाहीत, असे श्रीराम याने "सकाळ'शी बोलताना सांगितले. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arvind gets free form superstitions because of shreeram in Nandurbar