

आर्यनंदी पतसंस्थेत गुरुपौर्णिमा उत्सव
सोलापूर : आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेत गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी १०८ आचार्य आर्यनंदी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास संस्थापक-अध्यक्ष डॉ. राजेश फडकुले, उपाध्यक्ष बाहुबली दुरूगकर, संचालक प्रा. नीलेश एखंडे, सल्लागार डॉ. शिल्पा फडकुले, शोभना सागर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव आहेरकर उपस्थित होते. डॉ. फडकुले यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व सांगत संस्कार व सहकार्याची भावना वाढविण्याचा संकल्प व्यक्त केला. दुरूगकर व प्रा. एखंडे यांनीही गुरु-शिष्याच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित केले.
क्रांती दिनानिमित्त सोलापुरात रक्तदान शिबिर
सोलापूर : विविध वस्तू विक्री कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त श्री श्री रविशंकर हॉल, विठ्ठल मंदिर परिसर, विडी घरकुल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विक्री प्रतिनिधी व असंघटित कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी सुविधा नसल्याने आपत्कालीन प्रसंगी जीवनदान मिळावे, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष साईनाथ भिमर्थी आणि जिल्हा सेक्रेटरी व्यंकटेश लचमापुरे यांनी नागरिक, विक्री प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
हर्षवर्धन हायस्कूलमध्ये निर्भया पथकाचे मार्गदर्शन
सोलापूर : हर्षवर्धन हायस्कूल, हिप्परगे तळे येथे सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या निर्भया पथकाने भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलिस काका विलास सावंत व पोलिस दीदी महानंदा स्वामी यांनी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधक कायदे, मोबाइलचा दुरुपयोग, सायबर गुन्हेगारी आणि आपत्कालीन ‘११२’ क्रमांकाच्या वापराबाबत माहिती दिली. पर्यवेक्षक शांताराम सालगुडे व पल्लवी दराडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी दराडे यांनी केले, तर आभार सहशिक्षक संजय जवंजाळ यांनी मानले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
सन डेव्हलपर्सकडून गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप
सोलापूर : कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील सन डेव्हलपर्सच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त श्री आजोबा ताता गणपती मंडळ, गोदूताई परुळेकर नगर येथे गरजू व अनाथ विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. ५ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात सन डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा भुमेश यनगंदुल यांच्या हस्ते वह्यांचे वितरण करण्यात आले. शिक्षण हेच जीवनातील सर्वांत मोठे सामर्थ्य असून आर्थिक अडचणीमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड
सोलापूर : श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या २०२६-२७ या वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. नारायण गडगी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सत्यनारायण द्यावरकोंडा व अनिल धुळम प्रमुख उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीत प्रेसिडेंटपदी सुनील धुळम, व्हा. प्रेसिडेंटपदी नरसिंग म्हंता, अध्यक्षपदी आनंद रेब्बा, सचिवपदी लखन मिठ्ठा, सहसचिवपदी आकाश सानी, तर खजिनदारपदी संजय कुणी यांची निवड झाली. सल्लागार शंकर बटगिरी व श्रीनिवास बंदगी यांनी मार्गदर्शन केले. लखन रुमांडला यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.