आशा पारेख यांनी साधला दिलखुलास संवाद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

जोडीला त्यांच्यावर चित्रित गीते मंचावर कलाकार सादर करीत होते. त्याची दृश्‍ये पडद्यावर झळकत होती. हे अनुभवायला तो काळ जगलेल्या व आजच्या तरुणाईनेही सभागृहात गर्दी केली होती. 

पुणे - एके काळी "ग्लॅमर गर्ल', "हीट गर्ल' म्हणून हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या आशा पारेख मंचावरून दिलखुलास संवाद साधत होत्या. त्यांच्या कारकिर्दीतील अनेक हृद्य आठवणी, विविध दिग्दर्शक व अभिनेत्यांसोबत कामाचा अनुभव, मस्तीखोरपणाचे किस्से, आजचे चित्रपट व त्यांतील गीत-संगीताबाबत व्यक्त केलेली परखड मते त्या सांगत होत्या. जोडीला त्यांच्यावर चित्रित गीते मंचावर कलाकार सादर करीत होते. त्याची दृश्‍ये पडद्यावर झळकत होती. हे अनुभवायला तो काळ जगलेल्या व आजच्या तरुणाईनेही सभागृहात गर्दी केली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मकरंद पाटणकर प्रस्तुत "आशा पारेख लाइव्ह' हा कार्यक्रम रविवारी (ता.26) कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगत गेला. "कितना प्यारा वादा,' "आँखों से जो उतरी है दिल में,' "सुनो सजना पपीहे ने,' "जब चली ठंडी हवा,' "रात का समॉं,' "पर्दे में रहने दो', यांसारख्या गीतांच्या सादरीकरणातून गायक मकरंद पाटणकर, विवेक पांडे, कोमल कनकिया, ईशा रानडे व मनीषा निश्‍चल रम्य भूतकाळात नेत होते. या भारलेल्या वातावरणात निवेदक मानसी अरकडी यांनी पारेख यांना बोलते केले. "ही जुनी गाणी तुम्हाला आवडतात ना,' असा श्रोत्यांना प्रश्न विचारीत त्या म्हणाल्या, "या गाण्यांमध्ये माधुर्य होते. सुरेलपणामुळे ती लोकप्रिय होत. सध्याच्या गाण्यांमध्ये वाद्यांचा गदारोळापायी गोडवा हरपला आहे.' 

दर्शना जोग व आसिफ खान (की बोर्ड), मुकेश देढिया व विजय मूर्ती (गिटार), हर्षद गनबोटे (तबला), अभिजित भदे (ऱ्हिदम मशिन, ऑक्‍टोपॅड), केदार मोरे (ढोलक), केविन रुबडी (ड्रम्स) आणि सचिन वाघमारे (बासरी) यांची साथ असलेल्या गीतांवर स्वतः पारेख वेळोवेळी हातांनी ताल धरत होत्या. "सकाळ' या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर होता. 

पुण्याने जपली आहे संस्कृती 
आशा पारेख म्हणाल्या, "पुण्यात कथक व भरतनाट्यम शैलीचे नृत्य शिकवणारे अनेक वर्ग आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर नृत्याचे कार्यक्रम होतात. संगीत व साहित्याची जोपासना येथे फार छान करण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने पुणे हे संस्कृतीचा वारसा चालवणारे आहे, याचा अभिमान वाटतो.' 

पुण्याबद्दल विशेष स्नेह 
"माझी आई येथील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना माझे वडील दर शनिवारी तिला भेटायला येत असत. येथेच त्यांचे प्रेम रंगले, वाढले व नंतर त्यांनी लग्न केले अन्‌ मी या जगात आले. त्यांच्यामुळेच माझ्या मनात पुण्याबद्दल विशेष स्नेह आहे,' असे पारेख यांनी सांगताच नाट्यगृह टाळ्यांनी दुमदुमून गेले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: asha parekh interview