Ashadhi awari : इंदापूर तहसील कार्यालयावर पखवाज मोर्चा

उद्या इंदापूर येथे रास्ता रोको
तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याकडे निवेदन देताना ज्येष्ठ वारकरी पांडुरंग पवार व इतर.
तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याकडे निवेदन देताना ज्येष्ठ वारकरी पांडुरंग पवार व इतर.Sakal

इंदापूर - संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी मुक्कामाचे ठिकाण परंपरेनुसार श्री नारायणदास रामदास हायस्कूल मध्येच ठेवावे, या मागणीसाठी सोमवार, दि. २० जून रोजी इंदापूर तहसील कार्यालयावर पखवाज मोर्चा काढण्यात आला. ही मागणी मान्य न झाल्यास उद्या मंगळवार दि. २१ जून रोजी अकरा वाजता पंचायत समितीसमोर पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

निर्णय न झाल्यास गुरुवार, दि. २३ जून रोजी प्रशासकीय कार्यालयासमोर एक दिवसाचेलाक्षणिक उपोषण व रविवार दि. २६ जून रोजी प्रशासकीय कार्यालयावर शहरवासियांचा मोर्चा काढण्याचा निर्णय इंदापूरकरांनी घेतला आहे. त्यामुळे हा विषय संवेदनशिल झाला आहे. हा निर्णय न झाल्यास पालखी मुक्कामाच्या काळात दि. २ व ३ जुलै रोजी संपूर्ण इंदापूर शहर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.मोर्चा समारोप प्रसंगी नगरसेवक कैलास कदम यांनी नागरिकांच्या भावनांचे निवेदन वाचून दाखवले. त्यानंतर नगराध्यक्षा अंकिता शहा, ज्येष्ठ वारकरी ह.भ.प. पांडुरंग पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष उमा इंगोले, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना भोर व इतर महिलांच्या हस्ते निवेदन तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

सकाळी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास टाळमृदुंग,पखवाज वाजवत,ग्यानबा तुकारामच्या जयघोषात इंदापूरकर प्रशासकीय भवनात मोर्चाने पोहोचले.नगराध्यक्षा अंकिता शहा, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,कैलास कदम ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल राऊत,माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चमन बागवान, जकिर काझी , शेखर पाटील, अनिल पवार, प्रशांत शेटे, पांडुरंग शिंदे, पोपट पवार, प्रदीप पवार, रमेश शिंदे, राजू करडे महाराज, हनुमंत कांबळे,राजा राऊत, संतोष देवकर, बापू जामदार, पियुष बोरा,संजय बानकर,तुकाराम बानकर,नंदकुमार गुजर, शकील सय्यद,राजेंद्र हजारे,अक्षय सूर्यवंशी, पांडुरंग व्यवहारे यांच्यासह इंदापूरकर मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले.

गेल्या आठवडय़ापासून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्काम जागेच्या प्रश्नावरून शहरातील वातावरण गरम झाले आहे. शेकडो वर्षापासून पालखी इंदापूरात मुक्कामाला येते. रयत शिक्षण संस्थेच्या पटांगणात रिंगण सोहळा होतो. नंतर श्री नारायणदास रामदास हायस्कूल च्या प्रांगणात पालखीचा मुक्काम होतो. कोरोना काळात पालखीचा मुक्काम झाला नाही.यंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पटांगणात नूतन पालखी तळावर मुक्कामाचे नियोजन असून ते इंदापूरकरांना मान्य नाही.पूर्वीच्याच ठिकाणी मुक्काम असावा, अशी सर्वांची मागणी आहे. या संदर्भात मागील दोन दिवसात श्रीराम मंदीर व सिध्देश्वर मंदिरात लोकांच्या बैठका होवून चर्चा झाली असून त्यानुसार मोर्चाच्या निमित्ताने पहिली ठिणगी पडली आहे. शासनाने इंदापूरकरांची भूमिका त्वरित पालखी विश्वस्तांसमोर मांडावी व ठोस निर्णय घ्यावा,अशी मोर्चेक-यांची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com