
पुणे : भगवा ध्वज खांद्यावर घेऊन, टाळ-मृदंगाच्या निनादात, विठ्ठलनामाचा गजर करत दिंड्यांमधून शिस्तबद्ध पद्धतीने निघालेले लाखो वारकरी, तर दुसरीकडे डोईवर तुळशीवृंदावन घेत संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या नामसंकीर्तनात रमलेल्या माय-माऊली, तर कितीतरी वेळ रस्त्याच्या दुतर्फा थांबून अवघा पालखी सोहळा ‘याची देही, याची डोळा’ हृदयात साठवून लाखो पुणेकरांनी शुक्रवारी सायंकाळी पालखीतील पादुकांना माथा टेकवीत पंढरपूरच्या विठ्ठल भेटीची अक्षरशः अनुभूती घेतली. वारकऱ्यांबरोबरच पुणेकरांचाही शुक्रवारचा संपूर्ण दिवस भावभक्तीपूर्ण वातावरणात व वारकऱ्यांच्या सेवेत गेला.