

पुणे - पांढरे शुभ्र कपडे, कपाळी गंध-टिळा अन् हातात भगव्या पताका घेऊन पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांनाही पुण्यातील मेट्रोची भुरळ पडली. मेट्रो स्थानकावरील लिफ्ट, सरकत्या जिन्यांवरून तिकीट घर अन् तिकीट घेतल्यानंतर अडखळत, कावरे-बावरे होत आपोआप उघडणारा दरवाजा त्यांच्यासाठी अप्रूप होता. अशा भारावलेल्या अवस्थेत त्यांची पावले मेट्रोमध्ये शिरली आणि थंडगार मेट्रोतून प्रवासाचा आनंद त्यांनी लुटला. वारकऱ्यांच्या भजन-कीर्तनाने मेट्रोतही हरिनामाचा गजर घुमला.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी पुण्यात दाखल झाला. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मेट्रोने भुरळ घातली होती.
काही तरुण वारकऱ्यांनी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना आपल्यासमवेत घेऊन मेट्रोच्या प्रवासाची सफर करण्याचा आनंद लुटला. पिंपरी- चिंचवड, नाशिक फाटा, बोपोडी या ठिकाणांसह नगर रस्ता, कल्याणीनगर, पुणे रेल्वे स्थानक अशा ठिकाणांहून वारकरी मेट्रोतुन प्रवास करण्यासाठी येत होते.
बिघाडामुळे मेट्रोला ‘ब्रेक’, प्रवासी संख्या ‘सुसाट’
रविवारी सायंकाळी वनाजहून रामवाडीला जाणारी मेट्रो सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी ‘पुणे स्थानक’ या स्थानकावर दाखल झाली असता मेट्रोत बिघाड झाला. त्यामुळे १२ मिनिटे मेट्रो थांबून होती. ६ वाजून ३० मिनिटांनी बिघाड दूर झाल्यानंतर मेट्रो रामवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाली.
तर दुसरीकडे प्रवासी संख्या मात्र सुसाट होती. पुणे शहरात पालख्यांचे आगमन झाल्याने अनेक रस्ते बंद होते. त्यामुळे चांगला पर्याय म्हणून अनेकांनी रविवारी मेट्रोने प्रवास केला. त्यामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली. रविवारी रात्री ११ वाजेपर्यंत मेट्रोची सेवा सुरू होती.
पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आम्ही दरवर्षी येतो. यावर्षीही दिंडीसमवेत आम्ही जात आहोत. मागील वर्षी मेट्रो पाहिली होती. पण यंदा, मेट्रोतून प्रवास करण्याची इच्छा होती. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका येथून न्यायालयापर्यंत मेट्रोतून प्रवास केला. आम्ही नेहमी रेल्वेने प्रवास करतो, पहिल्यांदाच इतक्या छान, स्वच्छ मेट्रोतुन प्रवास करता आला.
-किसन जमदाडे, जालना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.