
Ashish Deshmukh : आशिष देशमुख यांनी स्वतः पक्षातून बाहेर पडावे
पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा मागणे म्हणजे केवळ चमकोगिरी आहे. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात राज्यात काँग्रेस चांगल्या प्रकारे काम करीत आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा माजी आमदार आशिष देशमुख यांनी स्वतः पक्षातून बाहेर पडावे, अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी निवेदन जारी केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कर्तृत्व मोठे असून, त्यांच्या कार्याचा ठसा देशभर उमटला आहे. आतापर्यंत त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्याला अधिक महत्त्व दिले आहे. जनतेचे हित आणि जनतेचा विकास हा त्यांनी घेतलेला ध्यास आहे. ते पदासाठी राजकारणात नाहीत तर जनतेच्या विकासासाठी राजकारणात आहेत, याचे भान देशमुख यांनी ठेवावे.
गतवर्षी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी थेट भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यावेळी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. आज पुन्हा आम्ही त्यांच्या हकालपट्टीची मागणी करीत आहोत, असे प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस सुरवसे पाटील यांनी सांगितले.