पाटस परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

पाटस परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य
Published on

कानगाव, ता. ८ : पाटस (ता. दौंड) येथील कारखाना रस्ता परिसरातील अष्टविनायक महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यालगतच कचरा टाकला जात असल्याने परिसराचे विद्रूपीकरण होत असून, वाऱ्यामुळे कचरा महामार्गावर पसरत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिसरात कचरा टाकण्याचे प्रकार सातत्याने सुरू असल्याने हा परिसर जणू कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाण बनल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. कचऱ्याच्या ढिगांमध्ये प्लास्टिक, घरगुती कचरा तसेच विविध टाकाऊ वस्तूंचा समावेश आहे. उघड्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण होत असून, आरोग्याच्या दृष्टीनेही हा प्रश्न गंभीर बनला आहे. अष्टविनायक महामार्गावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक, भाविक तसेच वाहनांची ये-जा सुरू असते. रस्त्यालगत साचलेला कचरा वाऱ्यामुळे महामार्गावर येत असल्याने वाहनचालकांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. अष्टविनायक यात्रेच्या महत्त्वाच्या मार्गावरील हा परिसर असल्याने स्वच्छतेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
महामार्गालगत कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायत प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. नियमित कचरा संकलनाची व्यवस्था करून कचरा रस्त्यालगत पडणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सरपंच आणि प्रशासकाची मुदत संपली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर महामार्गालगत साचलेल्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येईल.
- तात्या काळे, ग्रामविकास अधिकारी, पाटस

परिसराची स्वच्छता गरजेची
अष्टविनायक मार्गावरील पाटस हे महत्त्वाचे ठिकाण असल्याने परिसराची स्वच्छता व सुरक्षितता राखणे गरजेचे आहे. केवळ साचलेला कचरा हटविण्यापुरती उपाययोजना न करता, भविष्यात महामार्गालगत कचरा टाकला जाणार नाही, यासाठी नियमित कचरा संकलन, योग्य विल्हेवाट आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई अशी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.

पाटस (ता. दौंड) : कारखाना रस्ता परिसरात साचलेले कचऱ्याचे ढीग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com