अष्टविनायक आणि ज्योर्तिलिंग

अष्टविनायक आणि ज्योर्तिलिंग
Published on: 

अष्टविनायक आणि ज्योतिर्लिंग....

महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी शूरांची आणि वीरांची भूमी आहे. या पवित्र मातीमध्ये प्रत्यक्ष ईश्वर सुद्धा रमला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात श्रीगणेशाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आठ स्वयंभू गणेशाची स्थाने म्हणजेच, ‘अष्टविनायक.’ ‘अष्ट’ म्हणजे आठ आणि ‘विनायक’ म्हणजे गणपती. या बरोबरच महाराष्ट्रात ज्योतिर्लिगांचे महत्त्व आहे. महाराष्ट्रात एकूण ५ ज्योर्तिलिंग आहेत.
- गुंजन हरी देव

-----------------

अष्टविनायकातील गणपती कोणी मनुष्याने घडवलेले नसून निसर्गाच्या कुशीत स्वतःहून प्रकट झालेले म्हणजेच स्वयंभू आहेत. या सर्व मंदिरांचे पुनरुज्जीवन आणि जिर्णोद्धार प्रामुख्याने मराठा साम्राज्य व पेशवे काळात झाला. अष्टविनायक यात्रा ही महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण यात्रा मानली जाते. श्रीगणेश हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात विघ्नहर्त्या गणेशाच्या दर्शनाने करण्याची आपली समृद्ध संस्कृती आहे. या यात्रेमध्ये गणपतीच्या आठ स्वयंभू मूर्तींचे दर्शन होते. पौराणिक कथांनुसार, या आठही मंदिरांमधील गणपतीची रूपे वेगवेगळी आहेत. यापाठीमागे विशिष्ट धार्मिक पार्श्वभूमी आणि इतिहास आहे. ही यात्रा श्रद्धापूर्वक केल्यास आयुष्यातील सर्व विघ्न, संकटे दूर होतात आणि सुख, समृद्धी व आत्मिक शांती लाभते, अशी गणेशभक्तांची दृढ श्रद्धा आहे.

अष्टविनायकाची यात्रा मोरगावच्या मयूरेश्वराच्या दर्शनाने सुरू होते आणि थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव, सिद्धटेक, पाली आणि महाड या सर्व ठिकाणी श्री गणेशाचे दर्शन घेऊन पुन्हा मोरगावला येऊन पूर्ण करावी असे मानले जाते. यात्रेमुळे धार्मिक आणि आध्यात्मिक भावना जपली जाते. प्रवासामुळे महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा समजतो. यात्रेकरूला निसर्गरम्य परिसर आणि ऐतिहासिक वास्तुशिल्प यांचा सुंदर अनुभव मिळतो. गणेशभक्तांसाठी कुटुंबासोबत एकत्रित प्रवास करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

१. श्री मयूरेश्वर (मोरगाव)
हे स्थान मोरगाव (ता. बारामती, जि. पुणे) येथे करा नदीच्या तीरावर आहे. अष्टविनायक यात्रेचे हे पहिले आणि प्रमुख ठिकाण आहे. मंदिराची रचना एखाद्या भक्कम किल्ल्याप्रमाणे आहे. मंदिराला चार दरवाजे आणि उंच तटबंदी आहे. मंदिरासमोर एक भव्य नंदीची मूर्ती आहे, जी या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य आहे. प्राचीन काळी एका बलाढ्य असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर मोठा अनाचार सुरू केला. सर्व देवांनी गणेशाला प्रार्थना केली. प्रसन्न होऊन श्रीगणेशाने मोरावर आरूढ होऊन सिंधुरासुर याचा वध केला. म्हणूनच या रूपाला ‘मयूरेश्वर’ असे म्हटले जाते. अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि अखेरची सांगता मयूरेश्वराच्या दर्शनानेच पूर्ण मानली जाते.

२. श्री सिद्धिविनायक (सिद्धटेक)
हे स्थान सिद्धटेक (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथे भीमा नदीच्या तीरावर आहे. हे मंदिर एका टेकाडावर वसलेले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे या मंदिराच्या जीर्णोद्धारात आणि सभामंडपाच्या बांधकामात मोठे योगदान आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना, मधू आणि कैटभ हे दोन राक्षस निर्माण झाले. त्यांनी देवांशी युद्ध पुकारले. भगवान विष्णूंना अनेक वर्षे युद्ध करूनही त्यांचा पराभव करता आला नाही. विष्णूंनी सिद्धटेक येथे घोर तपश्चर्या केली. नंतर गणपतीने प्रसन्न होऊन विष्णूंना सिद्धी प्रदान केली, ज्यामुळे विष्णूंनी राक्षसांचा संहार केला. अष्टविनायकांपैकी हा एकमेव उजव्या सोंडेचा गणेश आहे. उजव्या सोंडेचा गणपती कडक मानला जातो. तसेच तो तात्काळ फळ देणारा असतो. संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण टेकडीला सुमारे एक ते दीड किलोमीटरची प्रदक्षिणा घालावी लागते.

३. श्री बल्लाळेश्वर (पाली)
हे स्थान पाली (ता. सुधागड, जि. रायगड) येथे आहे. गणेशाचे मंदिर पूर्वाभिमुख असल्याने माघ महिन्यात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची पहिली किरणे थेट गर्भगृहातील गणपतीच्या मूर्तीवर पडतात. मंदिराच्या मागे भव्य तलाव आहेत. त्रेतायुगात पाली गावात बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा राहत होता. गणेशाचा निस्सीम भक्त होता. तो आपल्या मित्रांना सोबत घेऊन गणपतीची पूजा करत असे. परंतु त्याच्या वडिलांना राग येत असे. संतापलेल्या वडिलांनी त्याला एका झाडाला बांधून ठेवले. खूप त्रास सहन करूनही बल्लाळाने गणपतीचा जप सोडला नाही. भक्ताच्या या निष्ठावंत भक्तीवर प्रसन्न होऊन गणपती तेथे प्रकट झाले. बल्लाळ नावाच्या भक्ताच्या नावावरून देवाचे नाव ‘बल्लाळेश्वर’ आहे. भक्ताच्या नावाने ओळखला जाणारा हा एकमेव गणपती आहे.

४. श्री वरदविनायक (महड)
हे स्थान महड (ता. खालापूर, जि. रायगड) येथे आहे. हे मंदिर अतिशय साधे आहे. मंदिराच्या आसपासचा परिसर निसर्गरम्य आहे. मंदिराच्या चारही कोपऱ्यांत चार रक्षक मूर्ती आहेत. गृत्समद ऋषींनी येथे घोर तप करून श्रीगणेशाला प्रसन्न केले. ऋषींच्या विनंतीवरून गणपतीने भक्तांच्या सर्व मनोकामना, चिंता दूर करून त्यांना इच्छित वर देण्यासाठी येथे निवास केला. ‘वरद’ म्हणजे आशीर्वाद देणारा. या मंदिरात अखंड नंदादीप प्रज्वलित आहे. भक्तांना निवांतपणे दर्शन घेण्याची आणि पूजा करण्याची दुर्मीळ संधी येथे मिळते.

५. श्री चिंतामणी (थेऊर)
हे स्थान थेऊर (ता. हवेली, जि. पुणे) येथे आहे. हे मंदिर पेशव्यांचे कुलदैवत आहे. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्यांनी आपल्या आयुष्याचा अंतिम काळ याच परिसरात घालवला. येथील लाकडी सभामंडप अत्यंत सुंदर आणि नक्षीदार आहे. सर्व चिंता दूर करणारा ‘चिंतामणी’ नावाचा एक दुर्मीळ मणी कपिला ऋषींकडे होता. गणासुर नावाच्या उन्मत्त राक्षसाने ऋषींकडून तो मणी बळकावला. तेव्हा ऋषींनी गणपतीचा धावा केला. श्री गणेशाने असुराशी युद्ध केले आणि त्याचा वध केला. तो मणी कपिला ऋषींना परत केली. ऋषींनी तो मणी श्री गणेशाच्या गळ्यात परिधान केला आणि त्याला ‘चिंतामणी’ नाव दिले. भक्तांच्या मनातील सर्व चिंता दूर करणारा, काळज्या व मानसिक अस्वस्थता दूर करणारा असा हा गणेश आहे.

६. श्री गिरजात्मज (लेण्याद्री)
हे स्थान लेण्याद्री (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे आहे. हे मंदिर डोंगरातील लेण्यांच्या गुहेत आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी सुमारे सव्वा तीनशे पायऱ्या चढाव्या लागतात. बांधकामशैलीमुळे संपूर्ण मंदिर नैसर्गिक सूर्यप्रकाशाने उजळून निघते. माता पार्वतीने लेण्याद्री डोंगरावर बारा वर्षे अत्यंत कडक तपश्चर्या केली. श्रीगणेश भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तिच्या पोटी बालरूपात प्रकट झाले. ‘गिरिजेचा आत्मज म्हणजे मुलगा’ म्हणून या रूपाला ‘गिरजात्मज’ असे म्हटले जाते. येथे गणपतीचे बालरूप पुजले जाते.

७. श्री विघ्नहर (ओझर)
हे स्थान ओझर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे आहे. मंदिराला भक्कम तटबंदी, विशाल प्रवेशद्वार आणि उंच दीपमाळा आहेत. मंदिराचा कळस सुवर्णमंडित आहे. मूर्ती अतिशय तेजस्वी आहे. राजा अभिनंदनाने स्वर्गप्राप्तीसाठी एक मोठा यज्ञ सुरू केला. यज्ञाचा भंग करण्यासाठी ‘विघ्नासुर’ नावाच्या राक्षसाने ऋषिमुनींच्या पूजेत व यज्ञात विघ्न आणण्यास सुरुवात केली. यावेळी श्रीगणेशाने विकट रूपात अवतार घेतला. गणेशाने विघ्नासुराचा पराभव केला. शरण आलेल्या आलेल्या विघ्नासुराने गणेशाला विनंती केली की, ‘‘तुमच्या नावाआधी माझे नाव जोडावे.’’ श्री गणेशाने ती विनंती मान्य करून ‘विघ्नहर’ नाव धारण केले. आयुष्यातील सर्व अडथळे, संकटे आणि विघ्ने दूर करण्यासाठी विघ्नहराची पूजा केली जाते.

८. श्री महागणपती (रांजणगाव)
हे स्थान रांजणगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथे आहे. या मंदिराची रचना अशी आहे की, विशिष्ट वेळी सूर्यकिरणे थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात. मंदिराचा सभामंडप भव्यदिव्य आहे. त्रिपुरासुर नावाच्या असुराने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडून वर प्राप्त करून तिन्ही लोकांत हाहाकार माजवला होता. नारदमुनींच्या सल्ल्यानुसार शंकराने युद्ध सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाची मदत घेतली. त्यानंतर शंकराने एकाच बाणाने त्रिपुरासुराचा वध केला. हे रूप गणपतीचे सर्वांत शक्तिशाली, आक्रमक आणि ‘महागणपती’ रूप मानले जाते.

शास्त्रातील नियमांनुसार अष्टविनायक यात्रा एका विशिष्ट क्रमाने केली जाते. यात्रा मोरगावपासून सुरू होते आणि सर्व आठ गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा मोरगावला येऊनच पूर्ण होते.

१.श्री मयुरेश्वर (मोरेश्वर) - मोरगाव, जि. पुणे (यात्रेचा प्रारंभ व शेवटचा बिंदू)
२.श्री सिद्धिविनायक - सिद्धटेक, जि. अहिल्यानगर
३.श्री बल्लाळेश्वर - पाली, जि. रायगड
४.श्री वरदविनायक - महाड, जि. रायगड
५.श्री चिंतामणी - थेऊर, जि. पुणे
६.श्री गिरिजात्मज - लेण्याद्री, जि. पुणे
७.श्री विघ्नेश्वर - ओझर, जि. पुणे
८.श्री महागणपती - रांजणगाव, जि. पुणे
पुन्हा मोरगाव - श्री मयुरेश्वर (शेवटी पुन्हा मोरगावला येऊन दर्शन घेतल्यावर यात्रा पूर्ण मानली जाते).

ज्योतिर्लिंगाचे महत्त्व
भगवान शंकराच्या बारा पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत. आध्यात्मिक केंद्र, ऐतिहासिक वारसा आणि निसर्गरम्य परिसरामुळे या पाचही ज्योतिर्लिंगांना अत्यंत उच्च स्थान आहे.

१. श्री त्र्यंबकेश्वर
हे ज्योतिर्लिंग नाशिक शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. या मंदिराचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे शिवलिंगाच्या जागी एक छोटासा खड्डा आहे. यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे प्रतीक असलेली तीन लहान लिंगे आहेत. या ठिकाणी गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावते. हे मंदिर १८ व्या शतकात श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी काळ्या पाषाणात बांधले. येथे दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

२. भीमाशंकर
हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात, सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये घनदाट जंगलात. हे ज्योतिर्लिंग भीमा नदीचे उगमस्थान मानले जाते. हा संपूर्ण परिसर ‘भीमाशंकर अभयारण्य’ म्हणून ओळखला आहे. येथे महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ बघायला मिळतो. मोठ्या खारीप्रमाणे दिसणाऱ्या या प्राण्यांची घरटी झाडावर असतात. या जंगलात अनेक औषधी वनस्पती आढळतात. त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर भगवान शिवाच्या अंगातून गळालेल्या घामाच्या थेंबांपासून भीमा नदीचा उगम झाला आणि शिव येथे ‘भीमाशंकर’ रूपात स्थिर झाले अशी कथा आहे. मंदिराची रचना जुन्या हेमाडपंथी शैलीतील आहे. मंदिराच्या आवारामध्ये चिमाजी आप्पांनी वसईच्या लढाईमध्ये पोर्तुगीजांना हरवून, जिंकून आणलेली भव्य घंटा आहे.

३. श्री घृष्णेश्वर
हे ज्योतिर्लिंग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एलोरा गावाजवळ आहे. हे भारतातील बारावे आणि शेवटचे ज्योतिर्लिंग आहे. हे जगप्रसिद्ध वेरूळच्या लेण्यांपासून हे मंदिर केवळ एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. परकीय आक्रमणांमध्ये मंदिराची हानी झाल्यानंतर १८ व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली. लाल रंगाच्या बेसॉल्ट पाषाणात असलेले हे मंदिर पाच मजली आहे. मंदिरावर असलेले नक्षीकाम अत्यंत देखणे आहे.

४. श्री औंढा नागनाथ
हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात आहे. ‘द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रा’ नुसार ‘नागनाथं दारुकावने’ असे वर्णन असलेले हे ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराची पहिली निर्मिती महाभारत काळात पांडवांनी केली होती अशी आख्यायिका आहे. हे मंदिर अतिशय भव्य आहे. प्राचीन दगडांचे कोरीव अतिशय सुरेख आहे. या मंदिराचे गर्भगृह जमिनीच्या खाली आहे.

५. श्री परळी वैजनाथ
हे ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ शहरात आहे. या ज्योतिर्लिंगाला ‘वैद्यनाथ’ असे सुद्धा म्हटले जाते. इथे भगवान शंकर वैद्याच्या रूपात भक्तांचे आजारपण दूर करतात अशी श्रद्धा आहे. रावणाने महादेवांना प्रसन्न करून घेतले. शिवलिंग लंकेत घेऊन जात असताना नारदमुनींच्या युक्तीने रावणाने ते शिवलिंग परळी येथे जमिनीवर खाली ठेवले. ते शिवलिंग नंतर तेथून हलवता आले नाही. परळी वैजनाथ येथे हर आणि हरी यांची एकत्र पूजा केली जाते.

आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात दिनचक्रातील बदल विश्रांती सारखाच असतो. कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करता येतो. थोडे निसर्गाच्या जवळ जायला मिळते. बदलामुळे मनाला थोडी शांतता मिळते. विचारांचे आदानप्रदान होते. कुटुंबीयांना एकमेकांना समजावून घेण्याची संधी मिळते. यासाठी कुटुंबीय नातेवाईक यांच्याबरोबर अधून मधून एखादी सहल व्हायलाच हवी. पर्यटन आणि अध्यात्म याची जोड असेल तर दुधात साखरच. यासाठी आपले कुटुंबीय नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचे समवेत एकदा अष्टविनायक आणि ज्योतिर्लिंगाची यात्रा हा एक उत्तम पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com