अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे रंगमंचावरच निधन

Ashwini Ekbote
Ashwini Ekbote

पुणे : रंगमंचावर नृत्य सादर करताना अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना अश्‍विनी एकबोटे (वय 44) यांचे शनिवारी निधन झाले. त्यामुळे चित्रपट, नाटक, नृत्यक्षेत्रात शोककळा पसरली आहे.

भरत नाट्य मंदिर येथे 'नाट्यत्रिविधा' हा नृत्य, नाट्य, संगीताचा विशेष कार्यक्रम शनिवारी सायंकाळी आयोजिण्यात आला होता. यात अश्‍विनी एकबोटे यांच्यासह डॉ. रेवा नातू, चिन्मय जोगळेकर अनुपमा बर्वे या कलावंतांचा समावेश होता. नृत्य मैफलीच्या समारोपाला एकबोटे या नृत्य सादर करणार होत्या. नृत्य सुरू झाले; पण समारोपाक्षणी ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्या रंगमंचावरच कोसळल्या. त्यामुळे कार्यक्रम थांबवण्यात आला. भरत नाट्य मंदिराशेजारीच असलेल्या एका खासगी रुग्णालयात त्यांना तातडीने दाखलही करण्यात आले; पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या मागे पती प्रमोद आणि मुलगा शुभंकर असा परिवार आहे.

हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून एकबोटे यांची ओळख होती. चित्रपट, नाटक, मालिका या तीनही माध्यमात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला होता. "देबू', "महागुरू', "बावरा प्रेम हे', "तप्तपदी', "आरंभ', "हायकमांड', "एक पल प्यार का', "क्षण हा मोहाचा', "मराठा टायगर्स' अशा चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. "दुहेरी', "दूर्वा', "राधा ही बावरी', "तू भेटशी नव्याने', "कशाला उद्याची बात', "अहिल्याबाई होळकर', "ऐतिहासिक गणपती' या मालिकांत "त्या तिघींची गोष्ट', "एका क्षणात', "संगीत बावणखणी' या नाटकातील त्यांची भूमिका गाजली. अभिनयाबरोबरच शास्त्रीय नृत्यावरही त्यांचे तितकेच प्रेम होते. त्या नृत्यसंस्थाही चालवत होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com