अस्मिता योजना कागदावरच (व्हिडिओ)

गायत्री तांदळे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पुणे - राज्यातील मुलींच्या व महिलांच्या स्वच्छतेचा गवगवा करत सॅनिटरी नॅपकिन माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेली अस्मिता योजना पुणे जिल्ह्यात पूर्णपणे फोल ठरली आहे. या योजनेत पुरविण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे.

पुणे - राज्यातील मुलींच्या व महिलांच्या स्वच्छतेचा गवगवा करत सॅनिटरी नॅपकिन माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेली अस्मिता योजना पुणे जिल्ह्यात पूर्णपणे फोल ठरली आहे. या योजनेत पुरविण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे.

त्यामुळे जिल्ह्यात या योजनेची केवळ कागदोपत्रीच अंमलबजावणी असल्याचे दिसत आहे. या योजनेच्या नोंदणीत राज्यात पाचवा क्रमांक पटकावत जिल्ह्याने आघाडी घेतली असली, तरी अंमलबजावणीत मात्र पिछाडीवर आहे. 

राज्याच्या ग्रामविकास खात्याने गेल्या वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त अस्मिता योजना जाहीर केली. ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुली आणि जिल्हा परिषद शाळांतील मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती व्हावी आणि माफक दरात त्यांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध व्हाव्यात, हा या योजनेच्या अंमलबजावणीमागचा मुख्य उद्देश आहे.

जिल्ह्यातील महिला बचत गटांमार्फत मुलींना माफक दरात या नॅपकिन गावपातळीवरच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुली आणि काही महिलांना जिल्हास्तरावर प्रशिक्षणही देण्यात आले. प्रशिक्षणानंतर संभाव्य लाभार्थी मुलींची नोंदणीही करण्यात आली. मात्र, नोंदणीनंतर या योजनेला मरगळ आल्याचे चित्र दिसू लागले आहे. जिल्ह्यात एक हजार ४०७ ग्रामपंचायती आहेत. या योजनेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी २ महिला बचत गटांनी नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या योजनेसाठी जिल्ह्यातील शाळांमधील मुलींना शाळेतच सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी संबंधित मुलींना अस्मिता कार्ड वितरितही करण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात मुलींपर्यंत या योजनेचा लाभच पोहोचतच नाही.

ई-वॉलेट रिचार्जमध्ये मागे
या योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या बचत गटांनी अस्मिता ॲपमधील ई-वॉलेटचे रिचार्ज करणे अनिवार्य आहे. सध्या जिल्ह्यात नोंदणी केलेल्या एकूण दोन हजार ६९७ गटांपैकी केवळ ४६० गटांनीच ई-वॉलेट रिचार्ज केले आहे. एकूण गटांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच अल्प आहे. राज्यात या महिन्यात पुणे जिल्ह्याचा आठवा क्रमांक आहे. गटांच्या नोंदणीत पुणे जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर असला, तरी प्रत्यक्षात नॅपकिन वितरणात खूपच मागे पडला आहे.

नॅपकिन वितरणासाठी नोंदणी केलेल्या बचत गटांची संख्या - २६९७ 
लाभधारक मुलींची संख्या २६ हजार ३७४ 
प्राप्त अस्मिता कार्डची संख्या ५ हजार ६२५ 
अस्मिता कार्ड न मिळालेल्या मुलींची संख्या २० हजार ७४९ 

अस्मिता योजना आमच्या गावापर्यंत अद्याप पोचलीच नाही. सध्या आम्ही ग्रामपंचायत पातळीवरच गावातील महिला व मुलींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देत आहोत.
 - प्रियांका मेदनकर, सरपंच, मेदनकरवाडी (ता. खेड)

बचत गटांना निकृष्ट दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन पुरविण्यात आल्याने राज्य सरकारची ही योजना फोल ठरली आहे. कोट्यवधीचा निधी यात खर्च झाला 
आहे. या योजनेचा फायदा गोरगरीब महिलांनाही झाला नाही. 
 - राणी शेळके, सभापती, महिला व बालकल्याण समिती, जिल्हा परिषद, पुणे

अस्मिता योजनेबद्दल माहिती आहे. परंतु, याद्वारे सॅनिटरी नॅपकिन आम्हाला मिळत नाहीत. अस्मिता कार्डही मिळाले नाही.
 - मयूरी ठाकूर, विद्यार्थिनी, श्रीसुमंत विद्यालय, पिंपरी बुद्रुक (ता. खेड)

Web Title: Asmita Scheme on paper Sanitary napkin