राशिभविष्य - श्रीराम भट - सप्तरंग

राशिभविष्य - श्रीराम भट - सप्तरंग
Published on

सकाळ -सप्तरंग, ता. १६ ऑगस्ट २०२६ साठी...
----------------------------------------------------
सदर : राशिभविष्य
(१६ ते २२ ऑगस्ट २०२६)
लेखक : श्रीराम भट
----------------------------------------------------
शीर्षक :
श्रावणमासातल्या चंद्रकलेची दैवी स्पंदने
----------------------------------------------------
श्रावणमासातील चंद्रकला या सृष्टीतील किंवा या भूतलावरील मार्दवता किंवा जिव्हाळ्याशी अतिशय संबंधित आहेत. त्यामुळेच सोमकांत मण्यालाही चंद्रामुळे पाझर फुटतो. किंबहुना नागलोकातीलही जिव्हाळा प्रकट करणारी नागपंचमी श्रावणमासातच त्या नागलोकीच्या जिव्हाळ्याला ओळखते. याच श्रावणमासात नारळी पौर्णिमेच्या हृद्य रक्षाबंधनाचा आणि श्रीकृष्ण जयंतीच्या अष्टमीच्या भावबंधनाचा सोहळा साजरा होतो.
माणसाचे हृदयस्पंदन हे दैवी स्पंदनच होय. त्यामुळेच हृदयीचा आत्माराम हा शब्दप्रयोग वापरला जातो. परतत्त्वाचा हृदयस्पंदनाशी संबंध येतो आणि अष्टमी तिथी ही या गूढ किंवा गुप्त हृदयस्पंदनाशी संबंधितच आहे. रूप आणि भाव यांच्या दर्शनाशी संबंधित असलेली अष्टमी तिथी किंवा अर्धांगिनी समरसतेशी संबंधित आहे. रूपदर्शन आणि भावदर्शन हे निखालस असणे किंवा दिसणे आणि अंतरीचा भाव एक असणे म्हणजेच अष्टमीची अर्धचंद्राकृती कला पाहणे होय. शुक्ल आणि कृष्णाष्टमीचे चंद्रदर्शन अर्धेच अर्थात सारखेच असते. माणसाचे रूपदर्शन आणि अंतरीचा भाव यात फरक नसणे, हाच एक सहजभाव ज्या वेळी प्रकट होतो, त्या वेळीच तो आध्यात्मिक भाषेत साम्यभाव म्हटला जातो. माणसाच्या हृदयाचा जो नित्य भाव आहे, तो अष्टमीशी संबंधित आहे.
मित्र हो, ज्योतिषशास्त्र हे चंद्रकलांच्या फटीतून माणसाच्या हृदयातील भाव जाणून घेणारे किंवा त्याच्या दर्शनाचा अभ्यास करणारे एक मानसशास्त्रच होय. जीवन एक रंगमंच आहे. सौंदर्यप्रसाधनांतून रूपदर्शन घडवणे आणि स्वाभाविक रूपदर्शन घडवणे किंवा होणे यात मोठा फरक आहे. श्रावणमासातील चंद्रकला या आपल्या स्वाभाविक रूपाविष्कारातून दैवी स्पंदने दाखवत असतात. त्यामुळेच त्या रक्षाबंधनाबरोबर मंगळागौरही साजरी करत असतात.

रस्त्यावरील बाचाबाची टाळावी
मेष : सप्ताहातील गुरु-बुध सहयोगाची पार्श्वभूमी विशिष्ट चमत्कार घडवणारीच राहील. विशिष्ट शत्रुत्व वा वाद संपतील. ता. २० ते २२ हे दिवस छान फलद्रूप होतील. सरकारी किंवा बँकांची कामे होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींची आरोग्यविषयक चिंता जाईल. विशिष्ट भावाबहिणींचे प्रश्न मार्गी लागतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात हरवाहरवीचे प्रसंग टाळावेत. पैशाचे पाकीट सांभाळा. कृत्तिका नक्षत्रास ता. १६ चा रविवार वाहतुकीत सांभाळण्याचा. रस्त्यावरील बाचाबाची टाळावी. घरातील कामगार वर्गाची मने जपावी. श्वानदंशापासून सावध राहावे.

वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल
वृषभ : सप्ताहातील ग्रहमानाची पार्श्वभूमी मोठीच साथ देणारी. महत्त्वाच्या कामांचे नियोजन अवश्य कराच. उद्याची चंद्र-शुक्र युती मोठेच भाग्यसंकेत देईल. सप्ताहातील प्रवास छान फलदायी होतील. तरुणांना मार्गस्थ करणारेच ग्रहमान राहील. ओळखी-मध्यस्थीतून नोकरीचे प्रस्ताव येतील. सप्ताहात गुरु आणि शनी या ग्रहांचे योग दैवी चमत्कारच घडवतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्र भ्रमण जीवनातील भावजीवन समृद्धच करणारे. नोकरीतील पर्यावरणही छानच राहील. वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल. ता. २० ते २२ ऑगस्ट हे दिवस आपल्या राशीस एकूण उत्तम फलदायी होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक जाहिरात माध्यमातून लाभ होतील. जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील.

मित्रांशी वाद टाळावेत
मिथुन : सप्ताह शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून मोठा प्रवाही राहील. सप्ताहाची सुरुवात वास्तुविषयक प्रश्न सोडवेल. विशिष्ट कायदेशीर प्रश्न सुटतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत बढतीचे योग चकित करतील. व्यावसायिक येणी येतील. घरात कार्ये ठरतील. आई-वडिलांचे भाग्योदय होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात दुखापती जपाव्यात. मित्रांशी वाद टाळावेत. उत्सव-समारंभात बेरंग होऊ देऊ नये. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात ता. १९ व २० हे अष्टमीच्या प्रभावातील दिवस सतत मोठ्या सुवार्तांच्या प्रभावात ठेवतील. हे दिवस परदेशस्थ तरुणांना पर्वणीसारखे बोलतील. नोकरीत स्थैर्य लाभेल.

शत्रूवर विजय मिळवाल
कर्क : सप्ताहातील राशींच्या एक्स्चेंजमध्ये आपला भाव चांगलाच वधारणार आहे. पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती जणू स्वर्गावर रोहणच करतील. घरात उत्सव-समारंभांचा मोठा माहोल राहील. सप्ताहात व्यावसायिक शत्रुत्वावर विजय मिळवाल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ चा रविवार चैन, चंगळ आणि मौजमजेचाच राहील. मौल्यवान खरेदी कराल किंवा ती कराच. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांचे अप्रतिम पाठबळ राहील. ता. २० ते २२ हे दिवस चढत्या क्रमाने शुभ बोलणार आहेत. तरुणांचे शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून मोठे प्युअर सीक्वेन्स लागतील. गाठीभेटी आणि मुलाखतींतून आपली सतत दखल घेतली जाईलच.

राजकीय व्यक्तींचे पाठबळ मिळेल
सिंह : शुक्र भ्रमण ग्रहांचे फिल्ड ताब्यात घेणार आहे. नोकरी-व्यावसायिक क्षेत्रात विशिष्ट पर्वच सुरू होईल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीविषयक नैराश्य जाईल. सप्ताहाचा शेवट श्रावणातील हर्षोल्हास साजरा करेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील अष्टमीचे प्रभावक्षेत्र आणि ता. २१ चा शुक्रवार जीवनात मोठी रंगसंगत आणणारा. वैवाहिक जीवनात एकप्रकारचा भावोन्मेषच राहील. देवदर्शने होतील. काहींना संतसहवास लाभेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींच्या बाबतीत विशिष्ट ग्रासलेली कोर्ट प्रकरणे मार्गी लागतील. काहींना राजकीय व्यक्तींचे उत्तम पाठबळ मिळेल. पुत्रोत्कर्षातूनही मोठा दिलासा मिळेल. नोकरीत योग्य ठिकाणी बदलीतून लाभ.

सरकारी कामे यशस्वी होतील
कन्या : सप्ताहातील राशीतील शुक्रभ्रमण ग्रहयोगांतून आपल्या राशीला सेलिब्रिटी करणार आहे. सप्ताहात आपल्यातील कलागुणांचा उत्तम प्रभाव पडेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती शत्रुत्वावर मात करतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना राशीतील शुक्र भ्रमण विशिष्ट सन्माननीय पदाचा लाभ करून देतील. आंदोलन न करताही सप्ताहातील ता. २० ची दुर्गाष्टमी प्रेमिकांचे मनोमीलन घडवेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठी ऐतिहासिक फळे देणारा. नोकरीच्या मुलाखतींतून छाप पाडाल. व्यावसायिक विशिष्ट ध्येय गाठले जाईल. सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना आर्थिक ओघ प्राप्त करून देणारा. विशिष्ट सरकारी वा बँकिंगविषयक कामे यशस्वी होतील.

शैक्षणिक क्षेत्रातले अडथळे जातील
तूळ : सप्ताह नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर अतिशय सुसंगतच राहील. सप्ताहातील अष्टमीच्या गुरुवारी गुरु आणि शनी यांच्या प्रभावातून मोठे चमत्कार घडतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींचे विशिष्ट हृदयशल्य जाईल. घरातील प्रिय व्यक्तीची ग्रासलेली चिंता जाईल. तरुणांचे विशिष्ट शैक्षणिक अडथळे जातील. विशिष्ट घरगुती वाद मिटतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ ची नागपंचमी भाजण्या-कापण्यातून अस्वस्थ करू शकते. रस्त्यावरील सिग्नल पाळा. रस्त्यावरील बाचाबाचीतून नागपंचमी साजरी करू नका. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या समारंभातून उपस्थिती लावणारा. नोकरीतील वर्चस्व वाढेल.

न्यायालयीन प्रकरणे सुटतील
वृश्चिक : सप्ताह गुरु आणि शनी या ग्रहांच्या सकारात्मक भूमिकेतून जीवनातील विरोध घालवणारा. यंदाचा श्रावण जीवनविषयक तत्त्वज्ञान समृद्धच करेल. व्यावसायिक चातुर्य फलदायी होईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्र भ्रमण गुरु आणि शनी यांच्या पाठबळातून मोठे फलद्रूप होईल. घरातील वृद्धांच्या चिंता जातील. सप्ताहात काहींची न्यायालयीन प्रकरणे सुटतील. सप्ताह नवपरिणितांचे जीवन मार्गस्थच करणारा ठरेल. वास्तुविषयक कर्ज मिळेल. ता. १६ चा रविवार विवाहेच्छूंच्या गाठीभेटी यशस्वी करेलच. तयारीत राहाच. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ व २२ हा सप्ताहाचा शेवट मोठा झगमगाटी राहील. गाठीभेटी, मुलाखती आणि करारमदार इत्यादींतून मोठा प्रभाव टाकणारा. व्यावसायिक प्रदर्शने यशस्वी होतील.

वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील
धनु : सप्ताहातील शुक्र भ्रमण नोकरी-व्यावसायिक घडामोडींतून प्रसन्न ठेवेल. सप्ताहाची सुरुवात घरात मंगलकार्ये ठरवेल. सप्ताहात विशिष्ट आरोग्यविषयक चिंतेचा भर ओसरेल. सप्ताहात विशिष्ट वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट भागीदारीविषयक प्रश्न मार्गी लागतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहाच्या आरंभी शुक्र भ्रमणाची स्पंदने चांगलीच खेचून घेतील. काहींना सरकारी माध्यमांतून लाभ होतील. काहींना जुन्या गुंतवणुकी संकटकाळी उपयोगी पडतील. सप्ताह भावंडांचे प्रश्न मार्गी लावेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहाचा शेवट थोरामोठ्यांच्या ओळखीतून नोकरी देणारा. स्वतंत्र व्यावसायिकांना भांडवलपुरवठा होईल. नव्या व्यावसायिक कामांचा पुरवठा होईल.

व्यावसायिक उत्कर्षाचा टप्पा गाठाल
मकर : सप्ताहातील भाग्यातील शुक्रभ्रमण गुरु आणि शनी यांच्या पाठबळातून छान फलद्रूप होऊन क्रियाशील करेल. ता. १६ चा रविवार सप्ताहाचे चांगलेच बजेट घोषित करणारा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सुवार्तांतून चर्चेत ठेवणाराच सप्ताह राहील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट नोकरी-व्यावसायिक उत्कर्षाचा एक टप्पा गाठून देणाराच. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर युक्तीनेच वाटचाल करावी लागेल. सरकारी नियम डावलू नका. बाकी धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात विशिष्ट स्पर्धात्मक यशातून फ्लॅश न्यूजमध्ये आणणाराच सप्ताह राहील. सप्ताहात नवपरिणितांना जीवनात स्थैर्य देणाऱ्या घटना घडतील. ता. २१ चा शुक्रवार मोठा भावरम्य राहील.

आर्थिक कोंडीतून बाहेर याल
कुंभ : सप्ताहातील ग्रहमान साडेसातीच्या झळा कमी करणारेच आहे. विशिष्ट आर्थिक कोंडीतून बाहेर याल. मित्रमंडळींकडून मदत होईल. सप्ताहात शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात कर्जमंजुरी होईल. काहींचा नूतन वास्तुप्रवेश होईल. सप्ताहातील गुरुवार-शुक्रवार आनंदोत्सवाचेच असतील. काहींना ओळखी-मध्यस्थीतून नोकरीचा लाभ होईल. सप्ताहातील ता. १७ च्या नागपंचमीजवळ वादविवाद टाळा. मूर्खांशी संवाद टाळा. शेजारीपाजारी गैरसमजातून होणारी भांडणे टाळा. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात व्यावसायिक सरकारी कामे यशस्वी होऊन कायमचा आर्थिक ओघ प्राप्त होईल. अर्थातच तसे करारमदार होतील.

नशीब उत्तम साथ देईल
मीन : सप्ताहातील ग्रहांची फिल्ड ॲरेंजमेंट मोठी अनुकूलच राहील. अनुभवी माणसे त्याचा उत्तम लाभ उठवतील. ता. १६ चा रविवार मोठ्या यशाची ग्वाही देणाराच. ता. २० ते २२ हे दिवस श्रावणमासीचे फळ-फुलांचे नंदनवनच फुलवतील. जीवनातील मोठे समारंभ साजरे कराल. तरुणांना हा सप्ताह नवकल्पनांतून उत्तेजन देणाराच. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नशीब उत्तमच साथ देईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींचा एका वेगळ्या पद्धतीत राज्याभिषेकच होईल. नोकरीत विशिष्ट पदाचा लाभ होईल. सप्ताहातील गुरुवारची अष्टमी नवपरिणितांच्या हृदयातील प्रेमस्पंदने घरातील आसमंत सुगंधित करतील. अष्टमीचा चंद्र पाहाच.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com