Pune Crime News : बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला पेटविण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 attempt to fire woman for withdraw complaint of rape crime pune

Pune Crime News : बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला पेटविण्याचा प्रयत्न

पुणे : बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी एका महिलेवर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुंढव्यात घडली. या घटनेत महिला बचावली असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

याबाबत एका ३८ वर्षीय महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी रमजान खलिल पटेल (वय ६०, रा. भीमनगर, मुंढवा) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिल्येा माहितीनुसार, फिर्यादी या पतीपासून विभक्त राहतात. न्यायालयातील कामानिमित्त त्यांची रमजान पटेल याच्याशी ओळख झाली. त्यानंतर आरोपीने या महिलेला २०१८ मध्ये बार्शी येथे नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी महिलेने रमजान पटेल याच्या विरोधात पांगरी (जि. सोलापूर) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सोलापूर न्यायालयात दाखल या खटल्याची सुनावणी सुरू असून, येत्या २३ जानेवारीला त्याची तारीख आहे.

दरम्यान, पटेल याने बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास महिलेला सोसायटीच्या आवारात गाठले. गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेला शिवीगाळ केली. बाटलीतून आणलेले पेट्रोल तिच्या शरीरावर ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु अंगाची आग होऊ लागल्याने महिलेने तेथून पळून स्वत:चा जीव कसाबसा वाचविला. या घटनेनंतर पटेल हा पसार झाला असून, मुंढवा पोलिस त्याचा शोध घेत आहेत.