जीवे मारण्याचा प्रयत्न

जीवे मारण्याचा प्रयत्न
Published on: 

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना सात वर्षांची शिक्षा

श्रीगोंदा सत्र न्यायालयाचा निकाल

अहिल्यानगर, ता. २५ ः डोक्यावर तलवारीने वार करून गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांना सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा श्रीगोंदा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एच. साळुंखे यांनी ठोठावली. अशोक गोविंद पाचपुते, नानासाहेब राजाराम पाचपुते, दीपक अशोक पाचपुते आणि दत्ता गोविंद पाचपुते (सर्व रा. काष्टी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

अंकुश बापूराव खोरे (वय ६०, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) हे १५ मे २०१७ रोजी शेतात जेसीबीच्या साहाय्याने मशागत करून बाभळीची झाडे काढत होते. याचा राग मनात धरून अशोक पाचपुते, नानासाहेब पाचपुते, दीपक पाचपुते आणि दत्ता पाचपुते या आरोपींनी ‘तू जेसीबीने बाभळी का काढतोस? यामुळे आमच्या पाइपचे नुकसान होईल,’ असे म्हणत फिर्यादी आणि साक्षीदारांशी वाद घातला. सर्व आरोपींनी संगनमत करून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यादरम्यान अशोक पाचपुते याने साक्षीदार पांडुरंग अंकुश खोरे यांच्या डोक्यावर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा वार अडविताना खोरे यांच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. या घटनेनंतर आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली तलवार लपवून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने आणि पोलिस उपनिरीक्षक एस. एस. पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यात सरकारतर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, फिर्यादीचा मुलगा, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकील केदार केसकर यांनी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायनिवाड्यांच्या आधारे केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.

न्यायालयाने चारही आरोपींना सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच धमकी दिल्याप्रकरणी प्रत्येकी दोन वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अशोक पाचपुते याला स्वतंत्रपणे दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. सहायक सरकारी वकील केदार केसकर यांनी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज पाहिले. पोलिस हवालदार एन. आय. नरुटे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com