राज्यपाल पुणे महापालिकेत लक्ष घालणार; निलेश नवलाखा यांच्या तक्रारीवर कारवाईचे आश्वासन 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

नवलाखा यांनी राज्यपालांशी बांधकाम व्यवसाय व महानगरपालिकेतील कारभार आणि समस्यांबाबत चर्चा केली. त्यावर राज्यपालांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत पुणे महापालिकेत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

पुणे - पुणे महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांप्रकरणी लक्ष घालून महापालिका प्रशासनाला विचारणा करून कारवाई करण्यासंबंधी सूचना करू, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी आज दिले. 

मराठी चित्रपट निर्माते निलेश नवलाखा यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांना पत्र लिहिले होते. त्याची त्याची दखल घेऊन राज्यपालांनी नवलाखा यांना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता भेटीचे निमंत्रण दिले होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले हेही यावेळी उपस्थित होते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नवलाखा यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, कंगना राणावत यांच्या ऑफिसच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने केलेल्या अतिक्रमणाच्या कारवाईत आपण वैयक्तिक लक्ष घातले. त्याप्रमाणे मी सुद्धा मराठी चित्रपट निर्माता व पुण्यात बांधकाम व्यावसायिक आहे. माझा पुणे महापालिकेच्या हद्दीत हडपसर येथे छोटासा प्रकल्प आहे. या भागात बेकायदेशीर बांधकामे गेल्या चार-पाच वर्षात झाली आहेत. तक्रारी करूनही त्यावर कारवाई झाली नाही. कंगणा राणावत यांचे बांधकाम बेकायदेशीर होते; परंतु माझे बांधकाम कायदेशीर आहे. मला म्हणणे मांडायची संधी मिळावी. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नवलाखा यांनी राज्यपालांशी बांधकाम व्यवसाय व महानगरपालिकेतील कारभार आणि समस्यांबाबत चर्चा केली. त्यावर राज्यपालांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत पुणे महापालिकेत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. कोविडमुळे उद्भवलेल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीबाबत राज्यपालांबरोबर चर्चा झाली, असे नवलाखा म्हणाले. 

"कलाकारांच्या प्रश्नासंदर्भात लक्ष घालू' 
मेघराज भोसले यांनी महाराष्ट्रातल्या आठ लाख कलाकारांच्या व्यथा मांडल्या. महाराष्ट्र सरकारने कलाकारांसाठी एक स्वतंत्र बोर्ड तयार करून त्यांचा आरोग्य विमा आणि घरांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली. त्यावर कलाकारांच्या प्रश्नासंदर्भात राज्यपालांनी योग्य ती दखल घेण्याचे आश्वासन दिले, असे राजेभोसले यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attention to the illegal constructions in the Pune Governor Bhagat Singh Koshyari assured