Pune : रिक्षांच्या मीटरची चाचणीच नाही; चालकांसह प्रवाशांचीही फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : रिक्षांच्या मीटरची चाचणीच नाही; चालकांसह प्रवाशांचीही फसवणूक

पुणे : रिक्षांच्या मीटरचे कॅलिब्रेशन (पुनःप्रमाणीकरण) करण्यासाठी रिक्षाचालकांची धडपड सुरू आहे. गेल्या १७ दिवसांत सुमारे ५७०० रिक्षांच्या मीटर कॅलिब्रेशनचे काम पूर्ण झाले. यात नापास होणाऱ्या रिक्षाचालकांचे प्रमाण अधिक आहे. हेच एजंटाच्या पथ्यावर पडत आहे. तपासणीमध्ये नापास झालेल्या रिक्षा चालकांना एजंटांना ३०० रुपये द्यावे लागत आहेत. रिक्षाच्या मीटरची रोड टेस्ट (रस्त्यावरील चाचणी) न होताच त्यांना पास करण्याचे काम काही आरटीओ निरीक्षक करीत आहेत.

पुण्यात रिक्षाची भाडेवाढ झाल्यावर १ सप्टेंबर व ३१ ऑक्टोबर दरम्यान मीटर कॅलिब्रेशन करण्याचे काम सुरु झाले. पुण्यातील ८२ हजार रिक्षांपैकी सध्या ५७०० रिक्षाच्या मीटरचे कॅलिब्रेशन झाले आहे. त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या रोड टेस्टमध्ये नापास होणाऱ्या रिक्षांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पास होण्यासाठी रिक्षाचालकांना नाइलाजास्तव एजंटांकडे जावे लागत असल्याचे काही रिक्षाचालकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. एजंटांकडे गेल्यावर पास होण्याची खात्री असल्याने ते त्यांना ३०० रुपये देतात. परिणामी, ३०० रुपये दिल्यावर कोणतीही चाचणी न घेता आरटीओने रोड टेस्टमध्ये पास केल्याचा अनुभव आल्याचा काही रिक्षाचालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘सकाळ’ला सांगितला.

चाचणी का घेतली जाते?

रिक्षा धावत असताना ठरलेल्या किलोमीटरसाठी ठरवून दिलेले भाडे मीटरवर येते का, मीटर योग्य पद्धतीने चालते का, हे पहिले जाते. त्यासाठी दोन प्रकारची टेस्ट घेतली जाते. पहिल्यांदा मीटरमध्ये सॉफ्टवेअर अपलोड केल्यावर तो व्यवस्थित आहे की नाही, यासाठी एमआयटी टेस्ट करावी लागते. मीटर योग्य असल्यास त्यास ‘एमआयटी’ प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर टेस्ट ट्रॅकवर प्रत्यक्षात चाचणी द्यावी लागते. या वेळी रिक्षा १.५ किमीचे अंतर कापल्यास रिक्षाचे भाडे २५ रुपये झाले पाहिजे, तसेच १.६ किमी झाल्यावर भाडे २८ रुपये होणे गरजेचे आहे. यात काही गडबड झाली की मोटार वाहन निरीक्षक रिक्षाला रोड टेस्टमध्ये नापास करतो. आकडे वाढवून प्रवाशांची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून ही चाचणी घेतली जाते.

पाच ठिकाणी होते चाचणी

अलंकार पोलिस स्टेशनसमोर,फुलेनगर-आळंदी रस्ता चाचणी मैदान, रामटेकडी इंडस्ट्रिअल इस्टेट, दिवे घाट, इयॉन आयटी पार्क, खराडी.

हा प्रकार योग्य आहे का?

रिक्षांच्या मीटरचे कॅलिब्रेशन करण्यासाठी एजंटांना ३०० रुपये द्यावे लागत आहेत. रिक्षाच्या मीटरची रोड टेस्ट न होताच त्यांना पास करण्याचे काम काही आरटीओ निरीक्षक करीत आहेत. यामुळे रिक्षाचालकांची लूट होतेच, शिवाय, मीटरबाबत वस्तुस्थिती पाहिली जात नसल्याने प्रवाशांचीही फसवणूक होत आहे. याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

एजंटांचा मुक्त वावर

रोड टेस्टच्या वेळी रिक्षाचालक व मोटार वाहन निरीक्षक हेच उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र तिथे एजंटांचा सुळसुळाट असतो. तिथे ते उपस्थित राहतातच कसे, हा प्रश्न आहे. आरटीओ प्रशासनाने मीटरच्या टेस्टसाठी पाच ठिकाणचे ट्रॅक निवडले आहेत. यात सर्वाधिक एजंट फुलेनगर आरटीओ, रामटेकडी व अलंकार पोलिस चौकी या ठिकाणच्या टेस्ट ट्रॅकजवळ उपस्थित असतात. एजंटांना अटकाव केल्यास हा प्रकार घडणार नाही.

एजंटांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. रिक्षाचालकांची जर फसवणूक होत असेल, तर त्यांनी एजंटांना पकडून पोलिसांकडे तक्रार द्यावे. रिक्षाचालकांचा हा आरोप तथ्यहीन आहे.

- डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

कॅलिब्रेशन ही प्रक्रिया वेळखाऊ व खर्चिक आहे. त्यात पुन्हा एजंटांना ३०० रुपये द्यावे लागतात, हा भ्रष्टाचार आहे. मुळात येथे एजंटांचे काय काम? आरटीओ प्रशासन त्यांच्यावर हरकत का घेत नाही.

 • - आनंद अंकुश,

 • अध्यक्ष, आम आदमी रिक्षाचालक संघटना

 • ८२ हजार

 • पुण्यातील रिक्षांची संख्या

 • ५,७००

 • कॅलिब्रेशन झालेल्या रिक्षा

 • १ सप्टेंबर ते

 • ३१ ऑक्टोबर

 • कॅलिब्रेशनची मुदत

 • ३०

 • आरटीओ निरीक्षक

Web Title: Atuo Meter Calibration Agents Drivers Passengers Are Cheated Pune Atuo Pune Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..