Pune News: बालरुग्णांना औंध रुग्णालयाचा आधार; नवजात बालकांसाठी दक्षता कक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aundh Hospital Pune News

Aundh Hospital : बालरुग्णांना औंध रुग्णालयाचा आधार; नवजात बालकांसाठी दक्षता कक्ष

Pune News - नवजात बालकांचे आजार गुंतागुंतीचे असल्याने पालकांना आर्थिक भुर्दंड तर सोसावाच लागतो. त्याबरोबरच बालक दगावण्याची शक्यताही असते. परंतु, औंध येथील जिल्हा रुग्णालयात बालकांसाठी सुरू केलेला विशेष नवजात दक्षता कक्ष त्यांच्यासाठी संजीवनी ठरत आहे.

जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत सुविधांनी सज्ज असलेल्या या कक्षाची जबाबदारी डॉ. टी. एफ. खान या सांभाळत असून डॉ. सुरेश लाटणे इन्चार्ज म्हणून काम बघत आहेत.

त्यांच्यासह डॉ. सुचित्रा खेडेकर, विद्या कांबळे या वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतात. तर मुख्य मुख्य अधिसेविका विजयमाला बेले, परिचारिका शुभांगी भिसे यांच्यासह त्यांच्या परिचारिका या बालकांची सुयोग्य काळजी घेतात.

येथील नवजात दक्षता कक्षाची विशेषतः म्हणजे टाळूला असलेल्या छिद्रावरील उपचार केवळ इथेच होतात. त्यामुळे येथील या विशेष कक्षाला अधिक महत्त्व आहे. येथून ५५० ग्रॅम एवढे कमी वजन असलेल्या बालकांपासून विविध आजार असलेल्यांवर यशस्वी उपचार करून सुखरूप घरी पाठवले आहे. २०१२ साली सुरू झालेला हा कक्ष सर्वसामान्य कुटुंबातील बालकांसाठी जीवदान ठरत आहे.

या आजारांवर खासगी दवाखान्यातील उपचार महागडे असतात. त्यामुळे याठिकाणी पालकांना आर्थिक भारही पडत नाही.

सरकारी पातळीवर या कक्षाचा कायापालट झाला असून सध्या येथे व्हेंटिलेटर, रेडिएंट वार्मर, फोटोथेरपी मशिनसह नवजात बालकांना आवश्यक त्या अद्ययावत सुविधा येथे उपलब्ध आहेत. सध्या येथे २४ खाटांची परवानगी असून २६ काचेच्या पेट्या आहेत. जिल्ह्यातून विविध भागातून नवजात शिशूंना उपचारासाठी येथे आणले जाते.

तसेच इतर सरकारी व खासगी दवाखान्यातूनही अनेक बालकांना उपचारासाठी इथे आणले जाते. जवळपास ७० टक्के बालके बाहेरून उपचारासाठी या कक्षात दाखल करण्यात येतात. दाखल झाल्यापासून २८ दिवस इथे बालकांवर उपचार केले जातात.

महिन्याला ७० ते ८० बाळांवर उपचार केले जातात. येथून उपचार घेतल्यानंतर बालकांचा जगण्याचा दर ९५ टक्के आहे. त्यामुळे बालकांसाठी हे विशेष नवजात दक्षता कक्ष संजीवनी ठरतआहे.

कक्षात असलेल्या सुविधा व उपचार...

  • फोटोथेरपी इन्स्ट्रमेंट

  • रेडिएंट वार्मर

  • टाळूला व ओठांना छिद्र, कावीळ, कमी वजन, अपूर्ण वाढ झालेले बाळ यांसह इतर आजार असणाऱ्या बालकांवर उपचार.

यावर केले जातात मोफत उपचार...

जिल्ह्याच्या विविध भागांतून उपचारासाठी येथे येणाऱ्या सर्व बालकांवर यशस्वी उपचार केले जातात. विशेषतः जन्मतःच हृदयाचे आजार, टाळूला व ओठांना छिद्र असलेले, कमी वजनाचे, श्वसनाचे विकार असलेले व काविळीसह इतर आजार असलेल्या बालकांचे उपचार येथे मोफत केले जातात.

जिल्ह्यातील विविध भागांतून उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील बालकांवर चांगले उपचार व्हावेत, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो, तसेच येथील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी सकारात्मक काम करतात. त्यामुळे गंभीर आजार असलेल्या बालकांना उपचाराअंती वाचवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत, ही बाब समाधानकारक आहे.

- डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय,औंध

माझ्या पत्नीची सातव्या महिन्यातच प्रसूती झाली आणि जुळी बालकं जन्मल्याने दोघांचेही वजन खूप कमी होते. आम्हाला एक मूल जगण्याची खात्री नसतानाही जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांनी योग्य उपचार करून काळजी घेतल्याने दोन्ही मुलांची वाढ चांगली झाली आहे. या रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सेवा अतिशय उत्तम असून, लहान बाळांसाठी हे रुग्णालय खरोखरच उच्च दर्जाचे आहे.

- तुषार बढेकर, पालक

एप्रिल २०२१ ते मार्च २२ या कालावधीत

  • ८०० बालक दाखल

  • ४२६ बाहेरून आलेले

  • ३७४ जिल्हा रुग्णालयातील

एप्रिल २०२२ ते आजपर्यंत

  • १०८४ बालक दाखल

विविध आजारांसह कमी वजनाच्या बालकांवर समाधानकारक उपचार केले आहेत. डॉक्टर, परिचारिका व इतर सहकारी यांचे सहकार्य लाभत आहे.

- डॉ. सुरेश लाटणे, इन्चार्ज, विशेष नवजात दक्षता कक्ष जिल्हा रुग्णालय, औंध