

पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान
सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत वेळ; ४१ उमेदवार रिंगणात, प्रशासन सज्ज
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात आठ जिल्ह्यांचा समावेश असून, निवडणुकीसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी एकूण ३ लाख २६ हजार ७०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आठ जिल्ह्यांमध्ये ८४२ केंद्रांवर मतदान होणार आहे. शुक्रवारी (ता. २३) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, मतदान प्रक्रिया सुरळीत, निर्भय व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.
शुक्रवारी (ता. २३) होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी बुधवारी (ता. २१) दुपारी ऑनलाइन पद्धतीने विभागातील आठही जिल्ह्यांचा आढावा घेतला. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांतील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मतदारांसाठी आवश्यक व्यवस्था, मतदान साहित्याची उपलब्धता, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थेची माहिती या वेळी घेण्यात आली. मतदान केंद्रांच्या परिसरात राजकीय पक्षांच्या बूथ व्यवस्थेसाठी करण्यात आलेल्या नियोजनाचाही आढावा घेण्यात आला.मतदारांना कोणतीही अडचण न येता मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदान केंद्रांवरील प्रवेश व्यवस्था, आवश्यक सुविधा, दिशादर्शक सूचना आणि मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची सज्जता यांची खातरजमा करण्यावर भर देण्यात आला.
मतदान साहित्याचे वितरण, मतपेट्यांची सुरक्षित वाहतूक, मतदानानंतर मतपेट्या जमा करण्याची व्यवस्था आणि मतमोजणी केंद्रावरील तयारी याबाबतही संबंधित जिल्हा प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवून मतदान करावयाचे असल्याने मतदारांना योग्य पद्धतीने मतदान करण्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. मतदानाच्या दिवशी उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींवर तातडीने उपाययोजना कराव्यात आणि सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखावा, असे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी या वेळी दिले.
आजचा आठवडी बाजार बंद
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. २३) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शुक्रवारी म्हणजेच मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी जारी केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.