

पदवीधर मतदारसंघात एकूण
३ लाख २६ हजार ७०१ मतदार
-मतदानासाठी ८४२ केंद्रे निश्चित: ३५० अधिकारी नियुक्त
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात एकूण ३ लाख २६ हजार ७०१ मतदार असून, मतदानासाठी ८४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे ३५० अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय आयुक्त जी श्रीकांत, सहआयुक्त प्रताप काळे, मंजूषा मिसकर, देविदास टेकाळे व उमेदवार उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना यावेळी देण्यात आल्या. निवडणूक प्रक्रियेबाबत काही तक्रारी किंवा सूचना असल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात, असेही श्रीकांत यांनी सांगितले.
उमेदवार व त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत ओळखपत्रे सादर करावीत. ओळखपत्राशिवाय मतदान केंद्रात प्रवेश मिळणार नाही. मतदान केंद्रात भ्रमणध्वनी व अन्य इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करण्यास मनाई आहे. मतदान प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.मतमोजणीसाठी ७० टेबल व टपाली मतपत्रिकांसाठी एक टेबल, असे एकूण ७१ टेबल असतील. प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक टेबलासाठी एक याप्रमाणे ७१ प्रतिनिधी नेमता येतील. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या विहित नमुन्यात अर्ज भरून ओळखपत्र घेणे आवश्यक आहे.
उमेदवारांच्या मदतीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये तसेच मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळे कक्ष उभारण्यात आले आहे. या ठिकाणावरून उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेतील सर्व आवश्यक सोयी सुविधा व मार्गदर्शन मिळेल. आठही जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून आवश्यक त्या परवानगी घेण्यात याव्या असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मतमोजणीत आवश्यक मतसंख्या कोणत्याही उमेदवाराला न मिळाल्यास सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवाराला बाद करून त्याच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीक्रमानुसार मतांचे हस्तांतरण केले जाईल. यावेळी सहआयुक्त प्रताप काळे व मंजूषा मिसकर यांनी निवडणूक प्रक्रिया, आचारसंहितेचे पालन, मतदान प्रतिनिधींची नियुक्ती, प्रचार साहित्याच्या मुद्रणाचे नियम व मतदानाच्या दिवशी पाळावयाच्या नियमांची माहिती दिली.
.....
कोट..
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उमेदवारांनी पुढाकार घ्यावा,
- जी. श्रीकांत, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त.
.....
४८ तास आधी निवडणूक प्रचार बंद
मतदानाच्या ४८ तास आधी सर्व प्रकारचा निवडणूक प्रचार बंद करणे बंधनकारक आहे. या कालावधीत सभा, ऑनलाइन माध्यमांद्वारे प्रचार व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रचारात्मक कृती करता येणार नाहीत. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. छापील प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव व पत्ता नमूद करावा. जात, धर्म, भाषा किंवा लिंगाच्या आधारावर मतदारांमध्ये भेदभाव निर्माण करणाऱ्या प्रचारास मनाई आहे. तसेच, मतदारांना प्रलोभने देणे, धार्मिक स्थळांवर प्रचार करणे, मतदानाची गोपनीयता भंग करणे व मतदान केंद्राजवळ प्रचार करणे प्रतिबंधित आहे. बोगस मतदानाची बाब निदर्शनास आल्यास तातडीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.