पासपोर्ट अर्जासाठी अधिकृत मदतनीस

शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पुणे - पारपत्रासाठी (पासपोर्ट) सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाल्यानंतरही तुम्हाला अर्ज भरताना काही अडचणी येत आहेत का? काळजी करू नका. यापुढे ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’मधील (सीएससी) अधिकृत प्रतिनिधींकडून केवळ शंभर रुपये शुल्काच्या मोबदल्यात तुम्हाला हा अर्ज भरून घेण्याची सुविधा प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून उपलब्ध होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, लवकरच ही केंद्रे व प्रतिनिधींची यादी पासपोर्ट कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

ऑनलाइन सेवा सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात चालणाऱ्या ‘एजंटगिरी’ला रोखण्यासाठी पासपोर्ट कार्यालयाकडून काही उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगानेच प्रत्येक जिल्ह्यात ‘सीएससी’मार्फत ही सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पासपोर्ट कार्यालयाने दिला आहे. प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी (पुणे) पदावर ३ एप्रिल रोजी रुजू झाल्यानंतर अनंतकुमार यांनी पहिल्याच दिवशी हा निर्णय घेतला. 

‘सीएससी’ यंत्रणेचा वापर  
‘मिनिस्ट्री ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी’तर्फे (मायटी) देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये २०१९ पर्यंत एक ‘सीएससी’ केंद्र सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. ‘सीएससी’ केंद्रांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी एजंटांकडे न जाता अधिकृत प्रतिनिधींमार्फत अर्ज भरून घ्यावेत, असे आवाहन अनंतकुमार यांनी केले. 

पोलिस पडताळणी सात दिवसांत
पासपोर्ट मिळविण्यातील मोठी अडचण म्हणजे पोलिस पडताळणीच्या प्रक्रियेला लागणारा वेळ. काही दिवसांपूर्वीच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. पडताळणीसाठी लागणारा वीस दिवसांचा कालावधी सात दिवसांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती अनंतकुमार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. पुणे- मुंबईत पोलिस पडताळणीसाठी लागणारा कालावधी कमी असला तरी ग्रामीण व निमशहरी भागांत वीस दिवसांपर्यंत वाट पाहावी लागत आहे. तो कालावधी कमी करण्यासाठी पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक, तसेच अन्य जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याचेही अनंतकुमार यांनी  सांगितले.

Web Title: Authorized Assistant for Passport Application