कुटुंब जगवायचं कसं? रिक्षाचालकांना पडलाय प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

- रिक्षाचं चाक थंडावल्याने रिक्षाचालक चिंतेत

बारामती : लॉकडाऊन सुरूय...रिक्षाचं चाक थंडावलय...पण साहेब घरातील चूल थोडीच बंद आहे...मुलाबाळांसह कुटुंबियांना जगवण्यासाठी वणवण करावी लागतेय...मदतीचा हात हवाय पण कोठेच आशेचा किरण दिसत नाही...बारामतीतील रिक्षाची चाक 18 मार्चपासून थंडावली...ती आजतागायत जागेवरच आहेत. दररोज रिक्षा चालवली तरच चार पैसे पदरात पडणार असा हा व्यवसाय.जेमतेम परिस्थिती असताना अनेकांनी पतसंस्थांतून जादा व्याजदराने कर्ज काढत रिक्षा घेत उदरनिर्वाहाचे साधन निर्माण केलेले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दैनंदिन व्यवसाय झाला तर घरही चालते आणि हप्तेही भरता येतात. प्रसंगी जादा काम करुन चार पैसे अधिकचेही मिळवता येतात. पण गेल्या दोन महिन्यांपासून सगळच ठप्प झाल्याने हप्त्यांचे तर लांबच, घर कस चालवायच हेच समजेनासे झालंय...बारामतीतील प्रमोद चव्हाण हे रिक्षाचालक व्यथा मांडत होते. मुलांना सकाळी खारी किंवा बटर द्यायचा म्हटलं तरी आता जीवावर यायला लागलयं...

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन महिने अनेक रिक्षाचालकांनी रिक्षा चालवलीच नाही, हातात पैसेच नाहीत काय कराव ते सुचत नाही, उधारीही कोणी देत नाही आणि घरही चालवायच आहे, काय होणार ते समजेनासे झालेय....अशी व्यथा विजय साबळे यांनी मांडली. पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजी गॅसचा खर्च तसेच देखभाल दुरुस्तीचा खर्च वजा जाता दररोज दोनशे ते तीनशे रुपये हातात पडतात, त्यावरच आमचं साधारण पाच जणांचे कुटुंब चालत...जेमतेमच कमाई असल्याने बचतीचा प्रश्न येत नाही, हातात पैसाच नसल्याने उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न आहे...

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉक्टरांकडे रुग्णाला घेऊन जाणारा रिक्षाचालक असतो, सर्वाधिक धोका तो पत्करतो, मात्र त्याला ना विमा संरक्षण ना कसली मदत...विम्याचा हप्ता भरल्यानंतर एक वर्ष क्लेम केला नाही तर पुढच्या वर्षी हप्त्याची मागणी होऊ नये, अशी आमची मागणी आहे, पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही, अशी भूमिका मारुती (अण्णा) समींदर यांनी मांडली.

अन्नधान्य, मुलांच्या शिक्षण शुल्कात सवलत, कर्जाच्या हप्त्यांमध्ये सूट, या सारख्या बाबींवर शासनाने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. 

एसटी, रेल्वेसेवेवरच अवलंबून...

दरम्यान जोपर्यंत एसटी व रेल्वे सेवा व्यवस्थित सुरु होत नाही, तोपर्यंत रिक्षाचालकांचेही दैनंदिन कामकाज सुरु होणार नाही, असेही रिक्षाचालकांनी सांगितले. 

•    बारामतीतील रिक्षांची संख्या 1100
•    रिक्षावर अवलंबून असलेली अंदाजे लोकसंख्या 6000
•    रिक्षाचालकांची दररोजची खर्च वजा जाताची कमाई- सरासरी 300 रुपये.
•    अनेक रिक्षाचालकांवर पतसंस्थांचे कर्ज
•    मुलांच्या शिक्षणापासून दैनंदिन खर्चावरही परिणाम होणार. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auto Drivers facing Various Problems in Baramati