फटाके घटले, श्रेय जनतेला, पर्यावरण चळवळीलाही

फटाके घटले, श्रेय जनतेला, पर्यावरण चळवळीलाही

जनचळवळीत, प्रबोधनात म्हणा की जनमताच्या दबावात आजही बऱ्यापैकी सामर्थ्य आहे. चांगले-वाईट यातील फरक लोकांना कळतो. व्यवस्थित पटवून दिले तर लोकही ऐकतात. आजवर जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणावर नेहमी चर्चा होत आली. कृती मात्र नाममात्र राहिली. पिंपरी चिंचवडकरांनी वाचाळपणा सोडून कृतीवर भर दिला. पर्यावरणाशी निगडित विषयांवर काही वर्षे सुरू असलेल्या प्रबोधनाचा उचित परिणाम या वेळी दिसला. ‘फटाके वाजवू नका’,‘हवेचे प्रदूषण टाळा’, ‘श्‍वसनविकाराचे शिकारी होऊ नका’,‘कानठळ्या बसणाऱ्या आवाजांनी बधिर होणार का?’ असा संदेश घरघरांत गेला. विविध संस्था संघटनांनी अगदी पोटतिडकीने प्रचार मोहीम राबविली. शाळा-महाविद्यालयांतून व्याख्याने झाली. ‘आम्ही फटाके वाजविणार नाही,’ अशा आणाभाका झाल्या. त्याचे फळ यंदाची दिवाळी एकदम सुखद गेली. फटाक्‍यांचा आवाज, धूर, कचरा अर्ध्याअधिक प्रमाणात घटला. जनतेनेही करून दाखवले. पिंपरी चिंचवडकरांची मान उंचावणारे चित्र पाहायला मिळाले. यावेळी शहरातील हवा आणि ध्वनिप्रदूषण मागच्या तुलनेत बऱ्यापैकी घटल्याचे खुद्द महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्‍यांबाबत सुनावल्याने त्यात आणखी भर पडली. परिणाम चांगलाच झाला. नागरिकांनी फटाके खरेदी न केल्याने शेकडो कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यापाऱ्यांनीही मान्य केले. पर्यावरणविषयक अशाच अन्य काही उपक्रमांमधील शहरवासीयांचा वाढता सहभाग हा हुरूप वाढविणारा आहे.

पवना, इंद्रायणी, मुळा वाचविण्यासाठी
शहरात पर्यावरण, प्रदूषण यावर विचार करणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी होती. ती आता शेकड्याने वाढली. निसर्गावर प्रेम करणाऱ्यांची चळवळ आता इथे चांगलीच रुजली आहे. पवनेची अवस्था पाहून दहा वर्षांपूर्वी डॉ. विश्‍वास येवले यांनी ‘पवना जलदिंडी’ सुरू केली होती. आज ती एक चळवळ झाली. शेकडो पर्यावरणप्रेमी व्यक्ती, संस्था, संघटना या विषयवार काम करतात. एका बड्या नेत्याने पवनेत भराव टाकून पाच मजली शाळा इमारत बांधली होती. त्या विरोधात न्यायालयात जाऊन इमारत भुईसपाट करायला भाग पाडले तेसुद्धा एका महिला कार्यकर्तीने. इंद्रायणी नदीत हॉटेलचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आणून तिथेही नदीवर प्रेम करणाऱ्यांनी कारवाई करायला लावली. एका पर्यावरण संवर्धन समितीने (ईसीए) सर्व शाळांतून पर्यावरणाचे धडे देऊन एक स्तुत्य उपक्रम राबविला. सुदैवाने पर्यावरणप्रेमी श्रावण हर्डीकर यांच्यासारखे आयुक्त लाभल्याने निबर महापालिका प्रशासनालाही बदलणे भाग पडले. आज पर्यावरणावर काम करणाऱ्यांची जंत्री वाढतेच आहे. प्राधिकरणातील सावरकर मित्र मंडळाने घोरावडेश्‍वराच्या पूर्ण डोंगरावर झाडी लावली, जोपासली आणि वनराई वाढवली. अंघोळीची गोळी या अजब नाव असलेल्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खिळेमुक्त अभियानातून झाडांना ठोकलेले खिळे काढले. आज राज्यभर ही चळवळ सुरू आहे. हातात पक्कड, हातोडा घेऊन झाडांचे खिळे काढणाऱ्या युवकांच्या बरोबरीने ज्येष्ठ नागरिक महासंघाचे असंख्य सदस्य या उपक्रमात असतात. भोसरीला सचिन ऊर्फ भैया लांडगे यांच्या सहकाऱ्यांनी मिळून दिघीच्या दत्तगडावर झाडे लावून चित्र बदलले. आज हे एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ झाले. हजारावर सभासद असलेल्या महेश लांडगे मित्र मंडळाने इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाचा संकल्प सोडला आहे. रानजाई प्रकल्पाच्या माध्यमातून सोमनाथ मसुडगे यांनी पवना, इंद्रायणीतील जलपर्णीमुक्तीची मोहीम सुरू केली. आज वाल्हेकरवाडी रोटरी क्‍लबसह हाउसिंग सोसायट्या, औद्योगिक कंपन्या, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थीही दर रविवारी नदी घाटावर फावडे घेऊन शेकडो टन जलपर्णी बाहेर काढतात. गायत्री परिवाराची निसर्गसेवा सर्वश्रुत आहे. प्राधिकरणातील गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टने वडाची, पिंपळाची ५०० रोपे वाटून हातभार लावला. स्वामी समर्थ ट्रस्टचे सर्व भक्तगण नदी स्वच्छतेसाठी पवनेच्या घाटावर प्रार्थना करतात आणि पात्रही स्वच्छ करतात. देहूच्या अयप्पा टेकडीचा लुक बदलला, कारण ज्ञानप्रबोधिनीचे संचालक यशवंत लिमये परिवाराने तिथे वर्षानुवर्षे वृक्षवल्ली जोपासली. शहरातील हाउसिंग सोसायट्यांनीही एक आदर्श घालून दिला. कचऱ्यापासून गांडूळ खत आणि वीजनिर्मिती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाण्यावर प्रक्रिया, चिमण्यांसाठी घरटी असे विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या स्वरगंगा, रोझलॅन्ड, गोखले वृंदावन, ॲरिस्टोक्रॅट यांचा उल्लेख करावा लागेल. प्रख्यात डॉ. संदीप बाहेती यांनी शहरभर वृक्षतोडीसंदर्भात एक आघाडी केली आणि बेदरकारपणे झाडे तोडणाऱ्यांना चाप लावला. हे काम करताना त्यांना जिवे मारण्याच्याही धमक्‍या आल्या, पण त्यांना भीक घातली नाही. अजमेरा कॉलनीतील वृक्षवल्ली ग्रुपने थेट सिंहगडावर प्लॅस्टिकमुक्त उपक्रम राबविला. सॉफ्टवेअर कंपनीचे मालक असलेले उद्योजक अविनाश भोकरे यांनी मुळा नदीवर काम करण्याचा संकल्प जाहीर केला. तनपुरे फाउंडेशन, पोलिस मित्र अशा संस्थांशिवाय भावसार व्हिजनचे राजीव भावसार, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांच्या जलबिरादरीचे नरेंद्र चुग, उद्योजक धनंजय शेडबाळे, प्रवीण लडकत अशा शेकडो कार्यकर्त्यांची फौज काम आहे. इंडो सायकलिस्ट क्‍लबचे अध्यक्ष गजानन खैरे यांच्यासह त्यांचे सर्व सदस्य हिंजवडीला आयटीमध्ये कामावर रोज सायकलने जा-ये करतात. टाटा मोटर्सच्या मोहन गायकवाड यांच्या संस्कार प्रतिष्ठानने अथक प्रयत्न करत मूर्ती दान चळवळ शहरात रुजवली. या वेळी तब्बल ५५ हजारांवर मूर्ती नदीत विसर्जित होण्यापासून थांबविण्यात त्यांना यश आले. शहराच्या भल्यासाठी या सर्व पर्यावरणप्रेमींनी एक व्यासपीठ निर्माण करून देण्याची गरज आहे. स्मार्ट सिटीसाठी ते गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com