Fire at Serum Institute : मृत भावाची कपडे पाहताच अविनाशने फोडला हंबरडा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

अविनाश आणि बिपिन सरोज हे दोघे सख्खे भाऊ. लॉकडाउननंतर हाताला काम नव्हते. पुण्यात काम मिळाल्याने मूळचे प्रतापगडमधील (ता. पट्टी, उत्तर प्रदेश) हे दोघे बंधू दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून ऑक्‍टोबरमध्ये पुण्यात आले. "सीरम'च्या मांजरी येथील प्रकल्पावर काम सुरू होते. त्या वेळी दुपारी अचानक आग लागली. त्या वेळी अविनाश घटनास्थळावरच होता.

पुणे  : "आम्ही आठ जण एकत्र काम करत होतो. काही कळायच्या आतच धुराचे लोट उठले. काय झाले हे कळायच्या आतच श्‍वास गुदमरू लागला. मी थेट खालच्या मजल्यावर उडी मारली. पण, माझा सख्खा मोठा भाऊ बिपिन हा इमारतीच्या डकमध्ये काम करत होता. त्याला बाहेर पडता आले नाही. जिवाच्या आकांताने त्याला हाका मारल्या पण... '' हे बोलत असतानाच अविनाश सरोजच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. प्रयत्न करूनही ते थांबत नव्हते. अग्नीप्रलयातून स्वतःचा जीव वाचवलेला अविनाश बोलत असतानाच अनेकांना गहिवरून आले. 

अविनाश आणि बिपिन सरोज हे दोघे सख्खे भाऊ. लॉकडाउननंतर हाताला काम नव्हते. पुण्यात काम मिळाल्याने मूळचे प्रतापगडमधील (ता. पट्टी, उत्तर प्रदेश) हे दोघे बंधू दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून ऑक्‍टोबरमध्ये पुण्यात आले. "सीरम'च्या मांजरी येथील प्रकल्पावर काम सुरू होते. त्या वेळी दुपारी अचानक आग लागली. त्या वेळी अविनाश घटनास्थळावरच होता. 

तो म्हणाला, "बिपिन आणि रमाशंकर हरिजन दोघे डकमध्ये काम करत होते. ऑक्‍टोबरपासून आम्ही पुण्यात कामासाठी आलो होतो. नेहमीप्रमाणे आज सकाळी आम्ही काम सुरू केले. आम्ही दोघेही भाऊ एकाच ठिकाणी काम करत होतो. अचानक धूर झाला. आम्ही तेथून अक्षरशः जिवाच्या आकांताने पळत होतो. मात्र, अविनाश डकमध्ये काम करत होता. तिथून बाहेर पडायला त्याला जागा नव्हती. तेथून लवकर बाहेर पडता आले नाही. अवघ्या दोन-तीन मिनिटांमध्ये इतका प्रचंड धूर झाला की समोरचे काही दिसायला तयार नाही. श्‍वास घेता येईना. काही पावले चालताही येत नव्हती. वरून खालच्या मजल्यावर उडी मारली. त्यामुळे जीव वाचला. मी त्याला हाका मारत होतो. पण, त्याने शेवटपर्यंत प्रतिसाद दिला नाही.'' हे बोलत असतानाच पोलिसांनी त्याच्या भावाची कपडे ओळख पटविण्यासाठी आणले. ते हातात घेऊन आतापर्यंत मोठ्या प्रयत्नाने आवरलेला त्याचा अश्रूंचा बांध फुटला. त्याचा हंबरडा पाहून खाकी वर्दीही गहिवरली. 

साडेदहा हजार पगार... 
उत्तर प्रदेशातून अवघ्या साडेदहा हजार रुपयांसाठी गावापासून दीड हजार किलोमीटरवर कामासाठी हे कामगार आले होते. पण, त्यांना आग नेमकी कशी लागली हे माहिती नाही. कामाच्या ठिकाणी धूम्रपान करता येत नाही. इतकेच काय पण, स्मार्ट फोनही घेऊन जाता येत नाही. कामावर जाताना आणि तेथून परत बाहेर पडताना प्रत्येक कामगाराची कसून तपासणी होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avinash Saroj cried when he saw his dead brother's clothes After Fire at Serum Institute