डेंगीपासून असा करा बचाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

थेरगावमधील पडवळनगर येथे दोन भावंडांचा डेंगीने मृत्यू झाला. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या आजारापासून कसा बचाव करावा आणि कोणती काळजी घ्यावी, या संदर्भात बी. जे. मेडिकल महाविद्यालयातील औषध वैद्यकशास्त्राचे माजी विभागप्रमुख व प्राध्यापक डॉ. बी. बी. कदम यांच्याशी केलेली बातचीत. 

थेरगावमधील पडवळनगर येथे दोन भावंडांचा डेंगीने मृत्यू झाला. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या आजारापासून कसा बचाव करावा आणि कोणती काळजी घ्यावी, या संदर्भात बी. जे. मेडिकल महाविद्यालयातील औषध वैद्यकशास्त्राचे माजी विभागप्रमुख व प्राध्यापक डॉ. बी. बी. कदम यांच्याशी केलेली बातचीत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रश्‍न - थंडीमध्येही डेंगीचा फैलाव होत आहे, याचे कारण काय? 
उत्तर -
 यंदा पावसाळा ऑक्‍टोबरपर्यंत सुरू होता. त्यामुळे पाण्याचा निचरा झालेला नाही. जेथे डासांची उत्पत्ती होते, ती ठिकाणे अनेक भागांमध्ये सक्रिय आहे. त्यामुळे या डासांचा फैलाव होत असावा. हे रुग्ण वर्षभर आढळून येतात. मात्र, पावसाळ्यामध्ये त्याचे प्रमाण सर्वाधिक असते. तो कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य त्या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. पाणी साचणारी ठिकाणे स्वच्छ करणे, औषध फवारणी करणे, असे उपाय करण्याची आवश्‍यकता आहे. 

या आजाराची लक्षणे काय? 
- हा विषाणूजन्य आजार असून, तो एडिस इजिप्ती या डासांपासून 
होतो. हा डास सकाळी व संध्याकाळच्या वेळेत दंश करतो. याच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांच्या कालावधीत हा आजार होतो. सुरुवातीला ताप येणे, अंगदुखी, अंगावर पुरळ उठणे, जुलाब, सर्दी ही लक्षणे दिसतात. 

बऱ्याचदा उलट्या होऊन भूक मंदावण्याचा प्रकारही होतो. यामध्ये रक्‍त वाहिन्यांमधील पाणी बाहेर पडते. परिणामी रक्‍ताचे प्रमाण कमी होते. यामुळे रक्‍तदाब कमी होणे, चक्‍कर येणे, अशक्‍तपणा अशी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय रक्‍तातील पेशी कमी होतात. यामुळे रक्तस्राव होण्याची शक्‍यता असते. त्वचेवर काळे-लाल डाग पडणे, अंगावर पुरळ येणे, खाज सुटणे अशी त्याची लक्षणे असतात. 

आजार झाल्यानंतर प्रत्येकाने कोणती खबरदारी घ्यावी?
- यावर औषध नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांच्या आधारावर उपचार केले जातात. रक्‍ताची दररोज तपासणी करून त्यामधील पेशींचे प्रमाण किती आहे, यावर नजर ठेवणे आवश्‍यक असते. या आजारात काही वेळेला हृदयाला सूज येणे, फुफ्फुसात पाणी होणे, नाडीचे ठोके वाढणे, असे गुंतागुंतीचे प्रकार निर्माण होतात. अनेकदा औषधे देऊन देखील ताप न उतरणे, उलट्या न थांबणे, असे प्रकार झाले; तर आजार गंभीर स्वरूपाकडे जात असल्याचे समजावे. 

या आजारापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी? 
- आजाराची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ डॉक्‍टरांकडून उपचार सुरू करावेत. या डासांपासून बचाव करण्यासाठी घरात कुठेही पाणी साचू देऊ नका, फ्रिजच्या खाली असणारा ट्रे, घरात असणाऱ्या कुंड्यांच्या खाली ठेवण्यात आलेल्या ताटल्या कायम 
कोरड्या ठेवा. 

डासांपासून बचावासाठी मच्छरदाणी किंवा अन्य उपायांचा अवलंब करावा. घराच्या आजूबाजूच्या परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेऊन तेथे औषध फवारणी करावी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avoid dengue and save life dr b b kadam discussion