esakal | 'लोकमान्यांच्या विचारांचा विस्तार आवश्‍यक'
sakal

बोलून बातमी शोधा

'लोकमान्यांच्या विचारांचा विस्तार आवश्‍यक'

देशाला स्वबळावर सामर्थ्यवान करण्यासाठी लोकमान्यांच्या विचारांचा विस्तार होणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी यांनी गुरुवारी येथे केले.

'लोकमान्यांच्या विचारांचा विस्तार आवश्‍यक'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - आपल्या देशाला आपल्याच बळावर बलवान बनविता येते; दुसऱ्याच्या बळावर नव्हे, अशी शिकवण लोकमान्यांनी दिली आणि त्यानुसारच भारत फोर्जची वाटचाल सुरू आहे. देशाला स्वबळावर सामर्थ्यवान करण्यासाठी लोकमान्यांच्या विचारांचा विस्तार होणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी यांनी गुरुवारी येथे केले. तसेच, ‘मेक इन इंडिया’मुळे येत्या पाच वर्षांत संरक्षण क्षेत्रातील आपल्याकडील उत्पादन वाढून आयातीचे प्रमाण कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. 

लोकमान्य टिळक यांच्या ९९व्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे कल्याणी यांना ‘लोकमान्य टिळक सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, सन्मानचिन्ह आणि १ लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते कल्याणी यांचा हा गौरव करण्यात आला. महापौर मुक्ता टिळक, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणिती टिळक या प्रसंगी उपस्थित होते.

कल्याणी म्हणाले, ‘‘लोकमान्यांनी मांडलेल्या स्वदेशी या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन भारत फोर्ज कंपनी स्वबळावर तंत्रज्ञान विकसित करून अत्याधुनिक उत्पादनाची निर्मिती करीत आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावरच ही कंपनी जगभरात पोचली आहे. भारत फोर्ज ही देशातील पहिली बहुराष्ट्रीय कंपनी आहे. संरक्षण क्षेत्रासाठी आपले आयातीचे प्रमाण सुमारे ७५ टक्के आहे. देशातील बदललेल्या परिस्थितीमुळे नजीकच्या काळात ते नक्कीच कमी होईल.’’

कल्याणी कुटुंबीयांची कराडमधून वाटचाल सुरू झाली अन्‌ १९६२ मध्ये आम्ही पुण्यात पोचलो. १९६५ मध्ये आपटे रस्त्यावर भाड्याच्या घरात राहिलो. वडिलांनी मुंढव्यात भारत फोर्ज कारखाना सुरू केला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर १९७२ मध्ये ५०० रुपये पगारावर आमच्या कारखान्यात नोकरी केली. त्यामुळे तंत्रज्ञान लवकर शिकता आले. कारखाना सांभाळण्यास सुरवात केल्यावर लोकांना सातत्याने तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले. त्यातून कंपनी देशात प्रथम क्रमाकांवर आली. त्यानंतर जगातील पाच पहिल्या कंपन्यांत स्थान मिळविण्याची जिद्द मनात बाळगून वाटचाल केली. चीनबरोबर स्पर्धा असताना तेथे भारत फोर्जची उत्पादने निर्यात करू शकलो, याचा अभिमान वाटतो, असेही कल्याणी यांनी सांगितले. 

पाटील यांचेही भाषण झाले. डॉ. टिळक लिखित ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक : द व्हिजनरी’ व ‘केसरी’चे वृत्तसंपादक स्वप्नील पोरे यांनी संपादित केलेल्या ‘काव्यातून टिळक दर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले.

loading image
go to top