माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे एक सप्टेंबर रोजी माढा तालुक्यात आगमन ; स्वागताची जय्यत तयारी हेलीकॉप्टरमधून पुष्षवृष्टी होणार

माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे एक सप्टेंबर रोजी माढा तालुक्यात आगमन ; स्वागताची जय्यत तयारी  हेलीकॉप्टरमधून पुष्षवृष्टी होणार
Published on

बबनराव शिंदे यांचे छायाचित्र

माजी आमदार शिंदे यांचे आज माढा तालुक्यात आगमन
स्वागताची जय्यत तयारी; जेसीबी, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

टेंभुर्णी, ता. ३१ : अमेरिकेतील सेंट लुईस येथील बीजेसी हॉस्पिटलमध्ये एक वर्षापूर्वी माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या हृदय प्रत्यारोपणाची (हार्ट ट्रान्सप्लांटेशन) शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मंगळवारी त्यांचे जन्म व कर्मभूमी असलेल्या माढा तालुक्यात आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी व बॅनर्स उभारण्यात आले असून जेसीबी व हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी दिली.
विक्रमसिंह शिंदे म्हणाले, माजी आमदार बबनराव शिंदे यांचे मंगळवारी सकाळी ११ वाजता पुण्याहून भीमानगर (ता. माढा) येथे आगमन होणार आहे. ते श्रीक्षेत्र रांजणी (देवाची) येथील श्री ओंकारेश्वरचे दर्शन घेतील. त्यानंतर आढेगावपाटी व शिराळपाटी येथून टेंभुर्णीतील अकलूज चौक व करमाळा चौकातील कार्यकर्त्यांचा सन्मान स्वीकारून प्रजापिता ब्रह्माकुमारी टेंभुर्णी केंद्रातील ओमशांती भवन येथे दुपारच्या जेवणासाठी थांबतील. त्यानंतर विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना प्रवेशद्वारावरील सत्कार स्वीकारून दुपारी तीनच्या दरम्यान कारखाना विश्रामगृह येथे पोचतील. विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना प्रवेशद्वारावर आगमन होताच सापटणे (टे.)चे माजी सरपंच बाळासाहेब उर्फ बी. के. गायकवाड यांच्यातर्फे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
कारखान्याच्या प्रांगणात वॉटरप्रूफ व्यासपीठ व मंडप उभारण्यात आला असून विविध कक्ष तयार करण्यात आले आहेत. कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्यासह गौरव समितीचे पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील आहेत. सायंकाळी चार वाजता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार बबनराव शिंदे यांचा सन्मान सोहळा होणार आहे.

बबनदादांची पाच प्रकारे ‘तुला’
साखर कारखान्यावरील विश्रामगृहात आगमन झाल्यानंतर बबनदादांची पेढे, फळे, धान्य, कपडे आणि ग्रंथ-पुस्तके अशा पाच प्रकारे ‘तुला’ करण्यात येणार आहे. शिंदे यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोशल डिस्टन्सिंगचा काटेकोर वापर करण्यात येणार आहे. नागरिकांकडून हार, गुच्छ, शाल, फेटे व बुके स्वीकारले जाणार नाहीत. त्याऐवजी शालेय उपयोगी वह्या, पुस्तके व पेन असे साहित्य स्वीकारले जाणार असल्याचे विक्रमसिंह शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com