esakal | अवघं जगणं शिवमय
sakal

बोलून बातमी शोधा

Babasaheb Purandare

अवघं जगणं शिवमय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज (ता. २९) शंभरीत पदार्पण करत आहेत. यानिमित्ताने ‘सकाळ’साठी ज्येष्ठ निवेदक, सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली त्यांची मुलाखत...

कपाळी कुंकूम, अंगावर जाकीट, सोनेरी काडीच्या चष्म्यातून संवादासाठी माझ्याकडे रोखलेले हसतमुख डोळे. बोलताना आवाजातही कणमात्र थकवा नाही. विशेष गोष्ट सांगताना आकाशाकडे हात फेकत उलगडला गेलेला पंजा. वाणीत स्पष्टता. घटनांमागच्या तारखा मांडण्याची जुनीपुराणी सवय. विशेष म्हणजे चेहऱ्यावर कणमात्र सुरकुती नाही. कोण म्हणेल यांना ‘शंभरीचे?’ या मुक्त गप्पांमध्ये न थकता दिलेले सलग दोन तास! खरंतर बाबासाहेब पुस्तकाचाच विषय. तरीही त्यांच्या व्यक्तिमत्वाची झलक कळावी, यादृष्टीने ही मुलाखत घेतली. जागेची मर्यादा लक्षात घेऊन मी त्यांना विनंती केली, की या मुलाखतीत संक्षेपाने आपण सर्व संदर्भ-टप्पे घेऊ. त्यांनीही मान्यता दिली. त्या संवादाचा हा गोषवारा.

प्रश्न - शंभरीत शिरताना तुम्हाला तुमच्या व्यक्तित्त्वाचं वेगळेपण काय वाटतं?

- वय वाढूनही वागण्यात कुठेही विसंगतपणा नाही. पूर्ण सुसंगत वागणं, हे माझ्या मते वेगळेपण. आम्ही एकूण १३ भावंडं; आता मी एकटाच. आम्हा सर्वांचा जन्म शनिवारचा. माझा तर पहाटे-पहाटे सूर्य उगवत असतानाच्या ऊबदार क्षणाचा. जन्मवार शनिवार असूनही तो ‘न’कर्त्याचा ठरला नाही. लताच्या मातोश्री माई मंगेशकरांनी ५१ वर्षांपूर्वी हात पाहून सांगितलं होतं, की शंभरी सहज ओलांडणार.

दीनानाथांचं नाटक पाहण्याचा योग आला होता का?

- तर! रणदूंदूभी, भावबंधन पाह्यलंय. ‘कठीण कठीण कठीण किती'' हे गाणं म्हणताना ऐकलंय.

तुमच्या भाषणांचे लाखो चाहते. तुम्ही कोणाच्या बोलण्यानं प्रभावित झालात?

- आमच्या वडिलांचं बोलणं खूप प्रभावी होतं. संताच्या-नामवंतांच्या गोष्टी सांगत. महत्त्वाच्या स्थळी घेऊन जात. पुढे इतिहास अभ्यास,संशोधन या क्षेत्रात ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन लाभले. ते माझे गुरू. माझ्या वक्तृत्वाला न. र. फाटक यांनी दाद दिली, तो क्षण विलक्षण धन्यतेचा होता.

लहानपणी कोणाच्या पुस्तकांनी झपाटलं होतं?

- हरी नारायण आपटेंचं लेखन आणि क्रांतिकारकांच्या जीवनकथा.

शिवचरित्र लिहिण्यामागची प्रेरणा?

- छत्रपती शिवाजी महाराजांचा अतुलनीय पराक्रम जगाला समजला पाहिजे, यासाठी झपाटला गेलो. त्यातूनच त्यांचे दशखंडी चरित्र लिहिले. छत्रपती शिवाजी महाराज विज्ञाननिष्ठ आणि प्रागतिक विचारांचे होते. त्यांच्या आरमारात होकायंत्र आणि एका नळीची दुर्बीण होती. सरहद्दीवर असलेले सागरी किल्ले भक्कम असावेत यासाठी त्यांचा विशेष आग्रह होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रागतिक दृष्टिकोन मला कायम मोलाचा वाटतो. त्यांचे द्रष्टेपण, त्यांचा क्रांतिकारक विचार सर्वदूर पोचला पाहिजे.

तुम्ही इतकी वर्षं लिहिताय. तुमची लिहिण्याची पद्धत?

- पूर्वी मी मांडी घालून जमिनीवर बसायचो. जेवायचा पाट माझ्या मांडीवर. त्याच्यावर कागद ठेवून लिहायचं. समोरच्या भिंतीवर तुळजापूरच्या भवानीमातेचं चित्र आणि गळ्यात कवड्यांची माळ. ‘दख्खनची दौलत’ हे माझं पुस्तक. वयाच्या दहाव्या वर्षांपासून लिहायला लागलो. आधी शिवचरित्र लिहिले. ते दामू केंकरेंच्या मदतीने प्रदर्शनात मांडावसं वाटलं. पुढे ‘जाणता राजा’ चा भव्य प्रयोग साकारला. याच्या नावाचं संपूर्ण श्रेय रामदास स्वामींना... यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, गुणवंत, जाणता राजा हे त्यांचेच शब्द.

तुमच्या पुस्तकांमधली अनेक चित्रं गाजलेले चित्रकार दीनानाथ दलालांनी चितारली आहेत. त्याची आठवण?

- मी दलालांच्या स्टुडिओत जाऊन, लेखनातल्या व्यक्तिरेखांचं बसणं, उभं राहणं, चेहऱ्यावरचे भाव त्यांना करून दाखवत असे. ते पाहून दलाल चित्रे काढत.

बारा हजारांहून अधिक व्याख्यानं देणारे तुम्ही! पहिलं व्याख्यान कुठे झालं?

- नागपूरला २५ डिसेंबर १९५४ ला राजाराम सीताराम ग्रंथालयात. जाहीर व्याख्यानमाला मुंबईत पार्ल्याला पु. ल. देशपांड्यांनी आयोजित केली होती. पुलंशी पहिली भेट झाली ती प्रकाशक रा.ज. देशमुख यांच्या घरी. त्यावेळी पु.ल. आकाशवाणीत होते. दिल्लीतून येताना विमानात त्यांनी ‘राजा शिवछत्रपती’ पुस्तकाचे खंड वाचले आणि भेटूया म्हणाले.

व्याख्यानांवर, कलाकृतींवर पैसे पुरेसे मिळाले का? त्या पैशांचा विनियोग कसा केला?

- कोटीत रुपये मिळाले. आंबेगावजवळ उभारत असलेल्या शिवसृष्टीवर खूप खर्च केले. सर्वसामान्य श्रोतेही खूष होऊन देणग्या देतात.पंधरवड्यापूर्वीच ५ जुलैला लाखभर रुपयांचा धनादेश एकाने पाठवला. तो निधी मी समाजकार्याला देतो. एका ठिकाणी आजवर ३४ लाख रुपये दिलेत. ‘पन्नास’पर्यंत द्यायचेत.

तुम्ही म्हणे नाटकात काम केलं होतं?

- आचार्य अत्रेंच्या ‘मी उभा आहे’मध्ये काम केलं होतं. वडीलमंडळींना नाटकात काम करणं मान्य नव्हतं. नाटकं विशेषतः संगीत नाटक पाहायला आवडतं. लेखन, अभिनय, नाटक, कविता, चित्रकला यातली सर्वात आवडती कला म्हणजे वक्तृत्वकला. माझ्या वक्तृत्व शैलीवर वडिलांचा प्रभाव आहे. शांता हुबळीकरांच्या ‘माणूस’मधल्या नाचाची उत्तम नक्कल करायचो. ते ६ भाषांतलं गाणं पाठ होतं. शांता आपटे, ज्योत्स्ना भोळेंची नक्कलही करत असे. मुख्य म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची त्यांच्यासमोर उभं राहून नक्कल केली होती.

तारखांसकट सत्तरहून अधिक वर्षे बोलताय. स्मरणशक्ती कशी जोपासली?

- ईश्‍वर कृपा. स्मरणासाठी कधीही औषधे घेतली नाहीत.

वयानं, कर्तृत्वानं तुम्ही ज्येष्ठ-श्रेष्ठ आहात. तरीही वर्तमान संस्थानिकांना मुजरे कशासाठी करता?

- ते मी त्यांच्या खिडकीतून पूर्वजांना केलेले वंदन असते.

आजवरचा सर्वोच्च आनंदाचा नि अभिमानाचा क्षण?

- २ ऑगस्ट १९५४ रोजी सिल्वासात भारतीय ध्वज चढवला तो! दादरा नगर हवेली सत्याग्रहात सहभागी होतो. आमच्याबरोबर सुधीर फडके, वाकणकरही होते. आयुष्यात सर्वाधिक समाधानाची भावना म्हणजे अमृत, प्रसाद दोन्ही मुले, दोन्ही सुना, नातवंडं यांचं मिळालेलं प्रेम!

हजार पानांचं शिवचरित्र छापण्यासाठी पैसे कसे उभे केले?

- भायखळा मार्केटमध्ये कोथिंबीर विकली. स्वतः फिरून पुस्तकविक्री केली.

ताकदीचे भाष्यकार कोण वाटतात?

- नरहर कुरुंदकर, त्र्यं. शं. शेजवलकर.

शिवचरित्र लेखनातलं वेगळेपण काय जपलं?

- शिवचरित्र सर्वसामान्यांच्या भाषेत कथन केलं. मी माझ्या लेखनात दंतकथा, सांगोवांगीच्या गोष्टी वापरल्या नाहीत. पुराव्याशिवाय विधान केले नाही.

तमाशाही आवडत होता ना?

- कौत्सल्याबाई कोपरगावकर, यमुनाबाई वाईकर, राधाबाई बुधगावकर यांच्या तमाशाला पुलंबरोबर गेलो होतो.

खास गौरव?

- दीदी म्हणजे लता मंगेशकरांनी शिवाजी गणेशनला माझा परिचय करून दिला तेव्हा त्या म्हणाल्या, ‘हे जे उभे आहेत ना, माझ्याशेजारी (हिंदीत) ते इतिहासातले लता मंगेशकर आहेत.’ तेव्हा मी संकोचलो.

शंभरीत इतके फिट कसे?

- निर्व्यसनी आणि मिताहार. तोदेखील शाकाहार.

loading image
go to top