

KLH26A04241
बाभळेश्वर ः राष्ट्रीय महामार्गावरील चौकात दररोज होणारी वाहतूक कोंडी.
बाभळेश्वरचा चौक बनला जीवघेणा
रस्त्यांतील त्रुटी, अतिक्रमणे आणि वाहतूक कोंडीमुळे अपघातांचा धोका
सुहास वैद्य
कोल्हार, ता. २५ ः चार प्रमुख जिल्ह्यांना जोडणाऱ्या अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील बाभळेश्वर येथील वर्दळीचा चौक जीवघेणा ठरत आहे. चौकातील अतिक्रमणे, महामार्गावरील खड्डे, रस्त्याच्या कामातील त्रुटी आणि दुभाजकांमधील तांत्रिक दोषांमुळे वाहतुकीची गुंतागुंत वाढली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या ठिकाणी चौक दर्शविणारे फलक, ब्लिंकर दिवे, जुना आणि नवीन रस्ता समपातळीत करणे तसेच रंबलर गतिरोधक बसविणे आवश्यक आहे.
अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील बाभळेश्वर चौकाजवळ परवा पुणतांबा येथील दुचाकीस्वार बाळासाहेब रखमाजी नळे यांचा रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या परिसरात लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरूच आहे. रस्त्यालगत व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांचा विळखा पुन्हा वाढत आहे. दुभाजकांची रचना योग्य नसल्याने कोल्हारहून श्रीरामपूरकडे वळताना वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
हॉटेल आणि टपऱ्यांसमोर ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी केली जातात. खासगी तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहनेही रस्त्यावरच थांबविली जातात. त्यामुळे धोका पत्करून प्रवाशांची चढ-उतार सुरू असते. याचा परिणाम स्थानकातून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या एसटी बसच्या वाहतुकीवरही होतो.
बाभळेश्वर बचाव कृती समितीने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे या ठिकाणच्या उड्डाणपुलाचे काम बंद करावे लागले होते. उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी उभारलेले अर्धवट खांबही त्यानंतर काढण्यात आले. हे अडथळे दूर केल्यानंतर चौकातील वाहतुकीचा प्रश्न सुटेल, अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा बदल झाल्याचे दिसत नाही.
........
लोणी पोलिस ॲक्शन मोडवर
बाभळेश्वर चौकातील वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी लोणी पोलिस ठाणे ॲक्शन मोडवर आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी चौकात दोन ते तीन वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती केली आहे. ही व्यवस्था कायमस्वरूपी ठेवावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आठरे यांनी आज महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता सिद्धेश डावरे आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) अधिकारी सागर ननवरे यांच्यासोबत पोलिस ठाण्यात बैठक घेतली. या वेळी चौकातील धोकादायक परिस्थितीवर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या समस्येबाबत संबंधित विभागांना यापूर्वीच लेखी कळविले असल्याचे आठरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.