बदामी डोक्याचा राघू आढळला

बदामी डोक्याचा राघू आढळला

Published on

किरकसालमध्ये ‘बदामी डोक्याचा राघू’

पक्षी निरीक्षणादरम्यान ओढ्याजवळ आढळला; जैवविविधतेतील महत्त्व अधोरेखित

फिरोज तांबोळी : सकाळ वृत्तसेवा
गोंदवले, ता. ४ : किरकसाल वनक्षेत्रात दुर्मिळ आणि अत्यंत देखण्या ‘बदामी डोक्याचा राघू’ या पक्ष्याची नोंद झाली असून, त्यामुळे या परिसराचे जैवविविधतेतील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अभ्यासक चिन्मय सावंत पक्षी निरीक्षणादरम्यान गाव ओढ्याजवळ नुकताच हा पक्षी आढळला. माण तालुक्यासारख्या कोरड्या प्रदेशात या प्रजातीचे दर्शन होणे ही अपवादात्मक आणि अभ्यासपूर्ण नोंद मानली जात आहे. हा पक्षी राज्यात प्रामुख्याने पश्चिम घाटातील जंगलांमध्ये आढळणारा स्थानिक रहिवासी असला तरी माणदेश परिसरातून त्याची नोंद यापूर्वी झालेली नव्हती. त्यामुळे किरकसालमधील ही नवी नोंद पक्षी अभ्यासकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

वैज्ञानिक संदर्भ आणि स्थलांतराचा दुवा

वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही संशोधनांनुसार बदामी डोक्याचा राघू केवळ स्थानिक हालचाली करणारा पक्षी नसून हिमालयात प्रजनन करणाऱ्या काही लोकसंख्या हिवाळ्यात दक्षिण भारताकडे स्थलांतर करतात. किरकसालमध्ये दिसलेला हा पक्षी अशाच हिमालयीन स्थलांतर मार्गावरून प्रवास करताना वाट चुकलेला किंवा प्रवासातील तात्पुरता पाहुणा असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रवासी पक्ष्यांसाठी सुरक्षित विसावा

पुण्यातील वेताळ टेकडी आणि मुंबई परिसरातील तुरळक नोंदींनंतर सातारा जिल्ह्याच्या कोरड्या पट्ट्यात ही नोंद होणे विशेष मानले जात आहे. अभ्यासकांच्या मते दीर्घ स्थलांतरादरम्यान पक्षी सुरक्षित ठिकाणी थांबून विश्रांती घेतात, अशा ठिकाणांना ‘स्टॉपओव्हर साइट’ असे म्हटले जाते. गेल्या काही वर्षांत पक्षी अभ्यासक चिन्मय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या किरकसाल संवर्धन प्रकल्पामुळे येथे पाणवठे, ओढे आणि मुबलक कीटकसंपदा निर्माण झाल्याने हा परिसर प्रवासी पक्ष्यांसाठी आकर्षक आणि सुरक्षित ठरत आहे.

ई-बर्डवरील पहिली नोंद

जागतिक पक्षी नोंद व्यासपीठ असलेल्या ‘ई-बर्ड’वर सातारा जिल्ह्याच्या या भागातून यापूर्वी बदामी डोक्याच्या राघूची कोणतीही नोंद उपलब्ध नव्हती. त्यामुळे किरकसालमधील ही नोंद राज्यातील पक्ष्यांच्या स्थलांतर मार्गांचा अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. ही नोंद केवळ एका दुर्मिळ पक्ष्यांच्या दर्शनापुरती मर्यादित नसून कोरड्या माळरानांचे संवर्धन जैवविविधतेसाठी किती आवश्यक आहे, याचे ठोस उदाहरण ठरत आहे. यापूर्वीही या परिसरातून असे पक्षी प्रवास करत असावेत. मात्र, त्यांची शास्त्रीय नोंद न झाल्याने ते दुर्लक्षित राहिले असण्याची शक्यता अभ्यासक व्यक्त करत आहेत.
-----------------------------
कोट -
ब्लू-चीकड बी-ईटर आणि अमूर फाल्कनसारख्या जागतिक स्थलांतरित पक्ष्यांनंतर आता बदामी डोक्याच्या राघूचे दर्शन होणे हे किरकसालच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवनाचे स्पष्ट लक्षण आहे. हा केवळ योगायोग नसून किरकसालचे माळरान आता पक्ष्यांच्या स्थलांतर मार्गावरील एक महत्त्वाचा ‘विसावा’ म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे या परिसराच्या संवर्धनाची गरज अधिक ठळकपणे समोर येत आहे.
-चिन्मय सावंत, वन्य अभ्यासक व किरकसाल संवर्धन प्रकल्प प्रमुख, किरकसाल
------------------------------
छायाचित्र -
26B02544
किरकसाल : पक्षी निरीक्षणदरम्यान बदामी डोक्याच्या राघूचे दर्शन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com