बाजीरावांचे पुणे ते मस्तानीचे पाबळ पुढील महिनाभरात पीएमपीएमएल बसेस धावणार | PMPML | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML

बाजीरावांचे पुणे ते मस्तानीचे पाबळ पुढील महिनाभरात PMPML बसेस धावणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिक्रापूर : पराक्रमी पहिले बाजीराव पेशवे व इतिहासातील सौंदर्यसौदामिनी मस्तानी या दोहोंच्या प्रेमकहानीमुळे नेहमीच चर्चेत राहिल्या पुणे आणि पाबळ (ता.शिरूर, जि.पुणे) या दोन्ही गावांना जोडणारी प्रवासी वाहतूक सेवा पुढील महिनाभरात सुरू होत आहे. मुखई (ता.शिरूर) येथील सरपंच सौ.ज्योती सचिन पलांडे, उपरपंच रमेश पलांडे यांचेसह मुखई ग्रामस्थांच्या मागणीवर हा निर्णय होत असून खासदार गिरीश बापट यांचाही या मार्गासाठी गेल्या काही दिवसांपासून पाठपूरावा सुरू होता.

पुणे महापालिकेची पीएमपीएमएल बससेवा सध्या जिल्ह्याच्या अनेक भागात आपला विस्तार वाढवत आहे. कधीच शक्य नाही होणार अशा मंचर, रांजणगव-गणपती अशा ठिकाणीही बससेवा सुरू झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या पाबळ-पुणे पीएमपीएमएल बससेवेसाठी या भागातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती. त्यातच मुखई (ता.शिरूर) येथील सरपंच सौ.ज्योती सचिन पलांडे, उपरपंच रमेश पलांडे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक अ‍ॅड.सुरेश पलांडे, खासदार गिरीश बाटपांचे स्वीय सहायक अमित सोनवणे आदींसह या भागातील ग्रामस्थांचे शिष्ठमंडळ पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना भेटले.

हेही वाचा: महागाई विरोधात आजपासून कॉंग्रेसचे जनजागरण अभियान

यावेळी पाबळ व पुणे या दोन्ही गावांचे ऐतिहासिक संदर्भही चर्चेला आले. तसेच इतिहासप्रेमींसाठीही ही सेवा उत्तम राहिल असे म्हणत रासने यांनी सदर बससेवा पुढील महिनाभरात चालू करुन घेवू अशी ग्वाही दिली. दरम्यान याबाबत रासने यांचेशी संपर्क साधला असता त्यांनीही बससेवा पुढील महिनाभरात सुरू करणार असल्याचे सांगितले.

रस्ता चांगला झाल्याने बससेवा शिक्रापूरमार्गे

मागील सरकारच्या काळात मंजुर अष्टविनायक मार्गाचे उत्तम काम सध्या पाबळ ते शिक्रापूर असे झाले आहे. पाबळमधील जैन धर्मियांचे पद्ममणी जैन मंदिर, जागतिक दर्जाची विज्ञान आश्रम ही संस्था, केईएमचे महिला उन्नती केंद्र तसेच धामारी व मुखईचा भैरवनाथ तसेच जातेगाव बुद्रुकचे महाविद्यालय असा मोठा परिसर या मार्गात येतो. हे सर्व जोडण्यासाठीचा मार्ग उत्तम झाल्याने या मार्गावर तात्काळ पीएमपीएमएल बससेवा सुरू करणार असल्याची माहिती श्री रासने यांनी दिली.

loading image
go to top