कुटुंबीयांसमवेत बकरी ईद साजरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

पुणे शहरातील कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी व सध्या वाढत असलेला बाधित रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता मुस्लिम बांधवांनी सामूहिकरीत्या ईदगाह मैदान किंवा मशिदींमध्ये एकत्र न येता आपापल्या घरीच नमाजपठण करून बकरी ईद साजरी केली.

पुणे - शहरातील कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी व सध्या वाढत असलेला बाधित रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता मुस्लिम बांधवांनी सामूहिकरीत्या ईदगाह मैदान किंवा मशिदींमध्ये एकत्र न येता आपापल्या घरीच नमाजपठण करून बकरी ईद साजरी केली. 

कुटुंबातील सर्व व्यक्तींनी एकत्र येत घरात किंवा टेरेसवरती नमाज पठण केले. त्यामुळे मशीद परिसरात शुकशुकाट होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात लॉकडाउनबाबत नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यात असलेल्या नियमानुसार सामूहिकरीत्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर असलेल्या बंदीचे समाजबांधवांकडून पालन करण्यात आले. त्यामुळे ईदगाह मैदानावर होणाऱ्या बकरी ईदच्या नमाज पठणाचा सामूहिक सोहळा रद्द करण्यात आला होता. आपापल्या घरांमध्येच नमाजपठण करावे. शासनाच्या कुठल्याही नियमांचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज प्रतिनिधींकडून करण्यात आले होते.  

बकरी ईदनिमित्ताने कुर्बान केलेल्या बकऱ्याचे तीन भागांत विभाजन करून एक हिस्सा स्वतःच्या घरी, दोन हिस्से गरीब घटक किंवा नातेवाईकांना देण्याची प्रथा आहे. सकाळच्या विशेष नमाज पठणानंतर ही कुर्बानी देण्यात येते. मात्र यावर्षी सार्वजनिक नमाज पठण होऊ शकले नाही. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुर्बानी देण्याचे प्रमाण देखील कमी झाले असल्याचे पाहायला मिळाले. बकरी ईदनंतर एक महिन्याने इस्लामिक नववर्ष मोहरम साजरा करण्यात येतो.

याबाबत साकिब आबाजी यांनी सांगितले की, यावर्षी एकदम साध्या पद्धतीने बकरी ईद साजरी करण्यात आली. मशीदमध्ये न जाता घरीच कुटुंबियांसमवेत नमाज पठण करण्यात आले. पूर्वीच्या तुलनेत यावर्षी कुर्बानी देण्याचे प्रमाण देखील अत्यल्प होते. कोरोनाचा फौलाव रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी ईदच्या निमित्ताने घेण्यात आली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bakri Eid celebration with family