दहावीच्या विद्यार्थ्यांनो, बालभारती आणतंय तुमच्यासाठी काही खास!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 December 2019

बालभारतीने प्रायोगिक तत्त्वावर "ई बालभारती' हे ऍप सुरू केले आहे. पालकांनी यामधील त्रुटी सांगितल्यास त्यात सुधारणा केली जाईल. त्यानंतर इतर इयत्तांसाठी विचार केला जाईल. 

- विवेक गोसावी, संचालक, बालभारती 

पुणे : "ई लर्निंग'च्या काळात बाजारात अनेक ऍप आलेले असताना आता बालभारतीनेही यात पाऊल टाकले आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना "ई बालभारती' या ऍपच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रम दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना हे "गिफ्ट' मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला राज्यातून लाखो विद्यार्थी बसतात. या वर्षी मे महिन्यात बालभारतीने ऍप तयार करण्याचे काम हाती घेतले होते. अभ्यास मंडळातील विषयांच्या तज्ज्ञांकडून सर्व धडे तपासून घेऊन या ऍपमध्ये या धड्यांना योग्य आवाज व चित्रांची सांगड घातली आहे. सध्या या ऍपवर दहावीच्या प्रत्येक विषयाचे तीन धडे उपलब्ध आहेत. 31 डिसेंबरपर्यंत हा संपूर्ण अभ्यासक्रम ऍपवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

मराठी, इंग्रजी, उर्दूत ऍप 

बालभारतीने मराठी, इंग्रजी व उर्दू या तीन माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हे ऍप तयार केले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत इंग्रजी व मराठी माध्यमाच्या सर्व विषयांचे सर्व धडे त्यावर अपलोड केले जातील. तर उर्दू माध्यमाचे सर्व विषय जानेवारी महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 

साडेसहा हजार जणांनी घेतला लाभ 

"ई बालभारती' या नावाने हे ऍप विनामूल्य उपलब्ध आहे. राज्यातील 6 हजार 448 जणांनी या ऍपचा वापर सुरू केला आहे. इंग्रजी माध्यमाचे 2 हजार 662, मराठीचे 3 हजार 166 आणि उर्दू माध्यमाचे 218 विद्यार्थी हे ऍप वापरत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bal bharati will introduce education App for 10 th Students