

बालाघाट बालमृत्यूप्रकरणी
जबाबदारी निश्चित करावी
दीपके यांची मागणी : आदिवासी गावांना भेट
बालाघाट (वृत्तसंस्था): मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील संसर्गजन्य आजारांमुळे काही ३० हून अधिक मुलांचा मृत्यू झाली. ही मुले गमावलेल्या कुटुंबांची भेट घेण्यासाठी कॉक्रोच जनता पक्षाचे संयोजक अभिजित दीपके यांनी शनिवारी (ता. १२) आदिवासी गावांना भेट दिली. या बालमृत्यूंसाठी प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
स्थानिक तरुणांसोबत दीपके यांनी अडोरी, कोरका आणि बोंदारी या गावांना भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची स्थिती तसेच मुलांच्या मृत्यूमागील परिस्थितीची माहिती घेतली. जिल्ह्यात संसर्गजन्य आजारांमुळे ३० हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करणारी जनहित याचिका दाखल झाल्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. रुग्णालयांतील गर्दी, दूषित पिण्याचे पाणी आणि पोषणाच्या अभावामुळे मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचा दावा याचिकेत केला आहे. या पार्श्वभूमीवर दीपके यांनी हा दौरा केला. माध्यमांशी बोलताना दीपके म्हणाले, की या मुलांना गमावलेल्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. प्रशासनाने मृतांची संख्या मान्य केली असली तरी, अद्याप कोणाचीही जबाबदारी निश्चित केलेली नाही किंवा कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई केलेली नाही, असा आरोप त्यांनी केला.
या आठवड्याच्या सुरुवातीला उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठाने बालाघाटमधील ३० हून अधिक बालमृत्यूंबाबत राज्य सरकारकडून उत्तर मागितले आहे. प्रभारी मुख्य न्यायाधीश विवेक रुसिया आणि न्या. प्रदीप मित्तल यांच्या खंडपीठाने जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्याच्या आरोग्य विभागासह महिला व बालविकास विभाग, बालाघाटचे जिल्हाधिकारी आणि अन्य संबंधितांना नोटिसा बजावल्या. याचिकेत मुलांना पुरेसे उपचार मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, केवळ ५० खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयात सुमारे ४०० मुलांवर उपचार सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बाधित भागातील हातपंपांमधून पिवळ्या रंगाचे पाणी येत असून, अनेक महिन्यांपासून मुले आणि महिलांना वेळेवर पोषक आहार मिळत नसल्याचाही दावा याचिकेत करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.