

पान ५ - तातडीने
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
संतुलीत अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे लक्ष द्या
- अनंत कुलकर्णी
कंट्री लीड, आयसीएल ग्रोविंग सोल्युशन इंडिया
--------------
पीक व्यवस्थापनामध्ये खतांचा असमतोल वापर का होत आहे?
- देशात युरियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे नत्राचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वापरले जाते. त्याचवेळी स्फुरद आणि पालाशचा वापर त्या प्रमाणात होत नाही. यामुळे पिकाला आवश्यक असलेलं नत्र, स्फुरद आणि पालाश यांचं संतुलन बिघडते. गरजेपेक्षा जास्त नत्र दिले तर त्यातील काही भाग पिकाला मिळतो, तर काही भाग जमिनीतून पाण्यासोबत खाली जातो किंवा इतर कारणांमुळे वाया जातो. म्हणून आता केवळ किती किलो खत वापरले यापेक्षा त्यातील किती अन्नद्रव्य प्रत्यक्ष पिकाला मिळाले आणि खताची कार्यक्षमता किती वाढली, याकडे पाहण्याची गरज आहे.
कोणत्या पिकांमध्ये खतांचा असमतोल अधिक जाणवतो?
- याकडे दोन प्रकारे पाहता येईल. एक म्हणजे पावसावर आधारित किंवा कोरडवाहू शेती आणि दुसरी म्हणजे सिंचनाखालील शेती. कोरडवाहू शेतीमध्ये अनेक वेळा पिकाला आवश्यक तेवढे अन्नद्रव्य मिळत नाही. तर सिंचनाची सुविधा असलेल्या आणि विशेषतः पाटपाण्याने पाणी दिल्या जाणाऱ्या पिकांमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी आणि त्यासोबत जास्त खत देण्याची शक्यता असते. विशेषतः उसासारख्या पिकांमध्ये पाटाद्वारे पाणी आणि जास्त खत वापरामुळे अन्नद्रव्याची कार्यक्षमता कमी होत आहे. त्यामुळे पिकाची गरज आणि जमिनीची स्थिती लक्षात घेऊन खतांचे नियोजन करणे गरजेचे आहे.
खतांच्या असमतोल वापरावर उपाय काय? शेतकऱ्यांनी कोणती पद्धत स्वीकारावी?
- जगभरात प्रचलित असलेली ‘फोर आर’ संकल्पना महत्त्वाची आहे. त्यामध्ये ''राइट सोर्स'', ''राइट डोस'', ''राइट प्लेस'' आणि ''राइट टाइम'' या चार गोष्टी येतात. म्हणजेच पिकासाठी योग्य खताचा स्रोत, योग्य मात्रा, योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी खत देणे. आपण फक्त खताची मात्रा वाढवली म्हणजे उत्पादन वाढेल असे होत नाही. उलट पिकाला गरजेपेक्षा जास्त खत दिल्यास खर्च वाढतो आणि जमिनीच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खत व्यवस्थापन हे पीकनिहाय आणि जमिनीच्या परिस्थितीनुसार असायला हवं. पाण्याचा योग्य वापर आणि योग्य खताचा स्रोत निवडणे महत्त्वाचे आहे. सोडियम आणि क्लोराइडचे प्रमाण कमी असलेल्या खतांचा योग्य पद्धतीने वापर करण्याकडेही लक्ष द्यायला हवं.
ठिबक सिंचन आणि फर्टिगेशनचा खत व्यवस्थापनात नेमका फायदा काय?
- ठिबक सिंचनामुळे पिकाला गरजेपुरतेच पाणी देता येते. त्याचबरोबर पाण्यातून खत देण्याची पद्धत म्हणजे फर्टिगेशन. फर्टिगेशनमध्ये पाण्यासोबत खत दिले जात असल्यामुळे ते पिकाच्या मुळांच्या परिसरात योग्य वेळी पोहोचते. त्यामुळे खताचा अपव्यय कमी करण्यास आणि पिकाला अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यास मदत होते. फर्टिगेशनसाठी १०० टक्के पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर करता येतो. मात्र ठिबक बसवले म्हणजे फर्टिगेशन झाले असे नाही. ठिबक वापरणाऱ्या शेतकऱ्यांपैकी खूपच कमी प्रमाणात शेतकरी फर्टिगेशनचा वापर करतात. त्यामुळे या पद्धतीचा अधिक विस्तार होण्याची गरज आहे.
पाण्यात विरघळणारी खते महाग आहेत. मग शेतकऱ्यांनी ती वापरावीत का?
- पाण्यात विरघळणाऱ्या विशेष खतांचा खर्च पारंपरिक अनुदानित खतांच्या तुलनेत जास्त आहे. फर्टिगेशनचे संपूर्ण नियोजन केल्यास सुरुवातीला सुमारे ३० ते ४० टक्के अधिक खर्च येण्याची शक्यता आहे. पण इथे फक्त खताची किंमत पाहणं योग्य नाही. खतामुळे उत्पादनात किती वाढ झाली, जमिनीची स्थिती कशी सुधारली आणि एकूण उत्पन्नात किती वाढ झाली, हे पाहणं महत्त्वाचं आहे. फर्टिगेशनमध्ये एक रुपया अतिरिक्त खर्च केल्यास त्याच्या तुलनेत तीन ते सहापटपर्यंत अतिरिक्त आर्थिक फायदा मिळू शकतो.
कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी खत व्यवस्थापन कसे असावे?
- राज्यातील मोठे क्षेत्र आजही पावसावर आधारित आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी फर्टिगेशनचा पर्याय प्रत्येक वेळी शक्य असेलच असं नाही. अशा परिस्थितीत पीकनिहाय खतांचा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते आणि फोलिअर फर्टिलायझेशन याकडे लक्ष देता येईल. कोरडवाहू भागात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळू शकते. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास नत्र, स्फुरद आणि पालाश दिले तरी त्यांचे पिकाकडून होणारे शोषण अपेक्षेप्रमाणे होऊ शकत नाही. त्यामुळे केवळ युरिया किंवा मुख्य खतांचा वापर वाढवण्याऐवजी पिकाला आवश्यक असलेल्या सर्व अन्नद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
मायक्रोन्यूट्रिएंट आणि बायोस्टिम्युलंटसाठी सरकारने काय करायला हवं?
- मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर वाढणे गरजेचे आहे. कारण मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही पिकाला आवश्यकता असते. बायोस्टिम्युलंटसारख्या पर्यायांचा वापर वाढवण्यासाठी थेट अनुदान देण्याऐवजी जीएसटी कमी करणे, आयात शुल्क कमी करणे किंवा उपलब्धता आणि परवडणारी किंमत यासाठी धोरणात्मक प्रोत्साहन देण्याचा विचार होऊ शकतो. यामुळे नवीन पर्याय शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतील आणि खतांच्या कार्यक्षम वापरालाही चालना मिळू शकते.
ग्रीन अमोनिया युरियाला पर्याय ठरू शकतो का?
- ग्रीन अमोनियाच्या दिशेने सरकारने घेतलेले पाऊल निश्चितच महत्त्वाचे आहे. नत्राच्या वापरातील असमतोल आणि नत्राच्या होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ही एक नवीन दिशा ठरू शकते. मात्र हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी गुंतवणूक, उत्पादनाचा खर्च आणि उपलब्धता या बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे याचा प्रत्यक्ष परिणाम किती आणि किती लवकर दिसतो, हे पाहणे गरजेचे आहे.
----------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.