‘बालभारती’कडून प्रयोगाची ‘दखल’

आशा साळवी  
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

पुस्तकांचा अन्‌ पर्यायाने दप्तराचा भार कमी व्हावा म्हणून महापालिका प्रशालेतील कल्पक शिक्षिकेने केलेल्या प्रयोगाची ‘बालभारती’ने दखल घेतली; पण श्रेयनामावलीत आपल्यालाच बेदखल करण्याचा ‘प्रयोग’ या शिक्षिकेला पाहावा लागत आहे.

पिंपरी - पुस्तकांचा अन्‌ पर्यायाने दप्तराचा भार कमी व्हावा म्हणून महापालिका प्रशालेतील कल्पक शिक्षिकेने केलेल्या प्रयोगाची ‘बालभारती’ने दखल घेतली; पण श्रेयनामावलीत आपल्यालाच बेदखल करण्याचा ‘प्रयोग’ या शिक्षिकेला पाहावा लागत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्याच्या ‘स्मार्ट’, ‘टेक’ अन्‌ ‘हायटेक’ युगात पाल्य आणि पालकांवर अनेक प्रकारचे ओझे असते. यातील शालेय शुल्क आर्थिक, तर पुस्तके शारीरिक ओझे असह्य ठरविणारी असतात. यानंतरही पोटचा गोळा सज्ञान, सुदृढ व्हावा म्हणून पालक पोटाला चिमटा काढतात; पण पाल्य जसजसा वरच्या वर्गात जातो तसतसा पुस्तकांचा भारही वाढत जातो. किमान तो तरी कमी व्हावा म्हणून प्रशासनाच्या पातळीवर उदासीनता नसली, तरी ठोस कृतीचा अभाव असताना एका शिक्षिकेने ‘एकात्मिक पुस्तके’ असा अनोखा  प्रयोग केला.

पिंपरी- चिंचवड महापालिकेने ‘एकात्मिक पुस्तके’ हा प्रयोग २०१६ मध्ये केला. त्यानंतर दरवर्षी त्या अशी पुस्तके तयार करतात. त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन शिक्षकदिनी तत्कालीन उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. तेव्हा त्यांचा सत्कारही करण्यात आला होता.

सध्या त्या म्हेत्रेवाडी शाळा क्रमांक ९२ मध्ये शिकवीत आहेत. त्या सहावीच्या वर्गासाठी हीच पुस्तके वापरत आहेत. अशी पुस्तके तयार करण्याचा प्रस्ताव बालभारती एस.सी.ई.आर.टी.चे तत्कालीन संचालक गोविंद नांदेडे यांच्याकडे सादर केला होता. तसेच, तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे, पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन ‘सीईओ’ सूरज मांढरे यांनाही प्रती पाठविल्या होत्या. 

‘सकाळ’ने हे वृत्त सर्वप्रथम दिल्यानंतर इतर प्रसार माध्यमांनी त्याची दखल घेतली होती. प्रशासनाच्या पातळीवर मात्र सुरुवातीला फार प्रतिसाद नव्हता. गुगल फॉर्म तयार करून या शिक्षकांमार्फत  सर्वेक्षणही करण्यात आले. आता तब्बल चार वर्षे उलटल्यानंतर ‘बालभारती’ने ही संकल्पना राबविण्याचा मुहूर्त अखेर काढला; पण जंगम यांचे साधे नाव  नमूद करण्याचेही सौजन्य दाखविले नाही.

शिक्षणमंत्र्यांची भेट
‘बालभारती’ने नामोल्लेखही टाळल्यामुळे व्यथित झालेल्या जंगम यांनी नुकतीच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली आणि त्यांना साकडे घालणारे पत्र दिले. त्यांनी माहिती घेऊन कळवू असे सांगितले. याविषयी जंगम म्हणाल्या, की ‘मी प्रसिद्धीपोटी हा प्रयोग केला नाही. मला त्याचे सकारात्मक परिणाम दिसले. मुलांना त्याचे फायदे झाले. पालकांनीही स्वागत केले. पालिकेच्या शाळा, तेथील सुविधा, शिक्षकांचे ज्ञान, त्यांची क्षमता-पात्रता याविषयी नकारात्मक सूर निघत असताना मी साधी-सोपी संकल्पना साकारली. याचे हेच ‘फळ’?’

२०१६ मध्ये शिक्षिका आनंदी जंगम यांनी हा प्रयोग सुरू केला आहे. त्यांच्या या प्रयोगाचे अनुकरण अनेक शाळांनी केले आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balbharati noticed the experiment done by the teacher