पुणे : बालभारती करणार दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन (व्हिडिओ)

पुणे : बालभारती करणार दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन (व्हिडिओ)

पुणे : स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाची बीजे रोवली गेल्यानंतर तत्कालीन शिक्षण विभागाकडून पाठ्यक्रमासाठी पुस्तकांची निर्मिती केली गेली. काळानुरूप अभ्यासक्रमात बदल होत गेला, तशी ही पुस्तकेही नामशेष होत गेली. काही दुर्मीळ पुस्तकांच्या प्रती बालभारतीच्या ग्रंथालयात आहेत. अशा 1837 ते 1940 पर्यंतच्या सुमारे दीडशे ब्रिटिशकालीन पुस्तकांचे डिजिटायझेशन करून त्यांचे संवर्धन करण्याचे काम बालभारतीने हाती घेतले आहे. 

बालभारतीच्या ग्रंथालयात पहिली ते बारावीपर्यंतचे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, पाली, संस्कृत या भाषांमधील सुमारे दीड लाख पुुस्तकांचा समावेश आहे. नवीन अभ्यासक्रम तयार करताना येथील पुस्तकांचा संदर्भ म्हणून वापर केला जातो. 

बालभारतीची स्थापना 1967 मध्ये झाल्यानंतर अनेक लोकांनी त्यांच्याकडील जुनी पुस्तके बालभारतीकडे जमा केली. यात ब्रिटिशकालीन पुस्तकांचा खजिनाही संग्रहित झाला. अभ्यासक्रम बदलल्यानंतर बाद झालेली पुस्तके पुन्हा संदर्भासाठी उपलब्ध होत नाहीत. 2005 पासूनची पुस्तके संकेतस्थळावर आहेत. आता 1837 ते 2004 पर्यंतची पाठ्यक्रम, पाठ्येतर, मासिके, ज्ञानकोश या सर्व ग्रंथसंपदेचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये 2 लाख 25 हजार पानांचा समावेश आहे. 


रसायनशास्त्राचे 1837 मधील पुस्तक 

बालभारतीच्या ग्रंथालयात हरी केशवजी यांनी 1837 मध्ये इंग्रजीतून मराठीत अनुवादित केलेले रसायनशास्त्राचे पुस्तक सर्वांत जुने आहे. स्टुडन्टस लिटररी सायंटिफिक सोसायटीने 1852 मध्ये प्रकाशित केलेले "ज्ञानबोधक', राय रामप्रसाद सिंह यांचे 1893 मधील "कृषिबोध', 1938 मध्ये अहमदनगर येथील डी. स्कूलबोर्डचे पर्यवेक्षक ग. म. घुले व य. पं. गंभीरलिखित "शास्त्र परिचय', हरी कृष्ण दामलेलिखित "शिक्षणसार' अशी सुमारे 150 पुस्तके येथे आहेत. त्यांचे आता डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. 

परदेशातून पुस्तकांची चौकशी 

पुण्यातील अनेक जण परदेशात स्थायिक झाले आहेत, त्यांना त्यांच्या मुलांना, नातवांना त्यांच्या काळातील पुस्तके दाखविण्याची इच्छा असते. बाजारात ही पुस्तके उपलब्ध नसल्याने यासाठी ते बालभारतीकडे चौकशी करतात. आता या पुस्तकांचे डिजिटायझेशन करून ती बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे प्रशांत धामापूरकर यांनी सांगितले. 

बालभारतीतील 2005पासून पुढील पुस्तकांचे डिजिटायझेशन झाले आहे. त्यापूर्वीच्या पुस्तकांचे काम आता हाती घेतले आहे. पुढील सात महिन्यांत या पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यात येईल. 

- प्रशांत धामापूरकर, ग्रंथपाल, बालभारती 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com