बालभारतीचे वैभव दुर्लक्षित

बालभारतीचे वैभव दुर्लक्षित

पुणे - शैक्षणिक वारसा असलेल्या पुण्यामध्ये दरवर्षी महाराष्ट्रभरातून शेकडो शाळांच्या सहली येतात; पण शाळेत शिक्षणासाठी जी बालभारतीची पाठ्यपुस्तके वापरली जातात, त्या संस्थेचा इतिहास, पुस्तक कसे घडते, अभ्यासक्रम कसा ठरतो, याचा प्रवास विद्यार्थ्यांनी समजून घ्यावा, यासाठी पुण्यासह राज्यभरातील शाळाच अनुत्सुक असल्याचे समोर आले आहे. वर्षभरात केवळ ११ शाळांनी बालभारतीला भेट दिली आहे. 

पुण्यात सेनापती बापट रस्त्यावर ‘बालभारती’चे सुसज्ज कार्यालय आहे. १९६७ ला स्थापन झालेल्या बालभारतीमध्ये १ली ते १२वी पर्यंतच्या पुस्तकांची निर्मिती होते. तेथे प्रत्येक प्रकारचे विभाग असून, मोठे ग्रंथालयही आहे. सध्या या ग्रंथालयात स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आत्तापर्यंतची लाखो पुस्तके आहेत. 

शाळांनी सहलीच्या निमित्ताने बालभारतीला भेट दिल्यास विद्यार्थांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी व प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र, . विद्यार्थ्यांनी बालभारती समजून घ्यावी यासाठी शाळाच उदासीन आहेत, त्यामुळे या मोठ्या संस्थेची विद्यार्थ्यांना ओळख होत नाही. २०१९ मध्ये केवळ  ११ प्राथमिक, माध्यमिक शाळांनी व अशासकीय संस्थांनी बालभारतीला भेट दिली आहे. इतर राज्यांतील अधिकारी, संशोधक, डीएड-  बीएडचे विद्यार्थी, अभ्यासक भेट देतात.

मुले होतात आश्‍चर्यचकित 
बालभारतीत विद्यार्थ्यांना सुरुवातीला चित्रफीत दाखवली जाते, त्यानंतर मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, सिंधी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमीळ, बंगाली या भाषेत पुस्तक कसे तयार केले जाते, याची माहिती दिली जाते. ग्रंथालयाची माहिती घेताना एवढे मोठे ग्रंथालय असताना त्यात पुस्तके कशी जतन करतात, कशी शोधतात, असे प्रश्‍न विद्यार्थी हमखास विचारतात. प्राचीन काळातील मराठीतील पुस्तके बघून विद्यार्थी भारावून जातात, असे बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी सांगितले. 

पुण्यात सहलीच्या निमित्ताने शाळा बालभारतीला भेट देतात. त्यांना या ठिकाणी सर्व प्रक्रिया समजावून सांगितली जाते. जे विद्यार्थी यात सहभागी होतात, ते सर्वजण वेगळा अनुभव त्यांच्यासोबत घेऊन घेतात.
- विवेक गोसावी, संचालक, बालभारती

९ माध्यम
४५० पुस्तकांचे प्रकार
८.५ कोटी वर्षभरात  वितरित  पाठ्यपुस्तके व पाठ्येतर पुस्तके 
९ - वितरण केंद्र
१००० - विक्रेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com