दोन महिन्यांतच पुन्हा खोदला पदपथ

दोन महिन्यांतच पुन्हा खोदला पदपथ

Published on

बालेवाडी, ता. ७ : येथील साई चौक परिसरात महापालिका निवडणुकीपूर्वी आमदार निधीतून करण्यात आलेले पदपथाचे काम अवघ्या दोन महिन्यांतच उखडण्यात आले आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) गॅस वाहिनी टाकण्यासाठी हे खोदकाम केल्याने करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
साई चौक परिसरातील कचरा विलगीकरण केंद्राजवळ काही दिवसांपूर्वीच नवीन पदपथ तयार करण्यात आला होता. हे काम करताना जुन्या पदपथाचे सिमेंट स्लॅब फोडून बाजूला टाकण्यात आले होते. मात्र, हे काम पूर्ण होऊन दोन महिनेही उलटले नाहीत, तोच गॅस वाहिनीसाठी पदपथ पुन्हा खोदण्यात आला. विशेष म्हणजे, खोदकाम केल्यानंतर केवळ माती टाकून खड्डे बुजविण्यात आल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी आठवडी बाजार भरतो, तसेच सकाळ-संध्याकाळ नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येतात. पदपथाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताची भीती व्यक्त होत आहे.
प्रशासनाने कोणत्याही नियोजनाशिवाय हे काम केल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत. या भागात सातत्याने अशा प्रकारे रस्ते आणि पदपथ खोदून सार्वजनिक पैशांचा चुराडा केला जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन हा पदपथ तातडीने दुरुस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

कोणतेही नियोजन न करता पदपथ पुन्हा खोदला आहे. काम आमदार निधीतून असो वा खासदार निधीतून, तो आमच्या कराचाच पैसा असतो. असा पैशांचा चुराडा होत असताना आम्हाला केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागते, हे आमचे दुःख आहे.
- हनुमंत बालवडकर, स्थानिक नागरिक

या ठिकाणी एमएनजीएलकडून नवीन गॅस वाहिनी टाकण्यासाठी पदपथ खोदण्यात आला आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येईल.
- योगिता भामरे, कनिष्ठ अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com