
पुणे : उन्हाळ्यात नव्या नळजोडला बंदी ?
पुणे : शहरात एकीकडे पाणी टंचाई निर्माण झालेली असताना दुसरीकडे पाण्याची मागणी मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जून अखेर पर्यंत नवे नळ देण्यावर काही बंधने घातली जाऊ शकतात का? या दृष्टीने पाणी पुरवठा विभागात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हा निर्णय कायदेशीर तसेच योग्य ठरेल का यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
उन्हाळ्यामुळे पुणे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. सर्वसाधारणपणे १५०० एमएलडी पाण्याची रोजची मागणी असताना गेल्या महिन्याभरापासून १६०० एमएलडी पेक्षा जास्त पाणी वापरले जात आहे. खडकवासला धरण प्रकल्पात ९.९१ टीएमसी पाणी शिल्लक आहे. हा पाणीसाठा १५ जुलै पर्यंत वापरावा लागणार आहे. त्यामध्ये पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य आहे. तसेच त्यानंतर शेती, उद्योग यांना पाणी दिले जाते. जर पावसाळा लांबला तर पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून पाणी वापर कमी करा असे महापालिकेला कळविले जाते.
शहरातील एकीकडे पाण्याची मागणी वाढत असताना दुसरीकडे २३ गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. त्यासाठीचे नियोजन सुरू आहे. सध्या अनेक भागात कमी दाबाने पाणी येत आहे, त्यामुळे नागरिक टंचाईला सामोरे जात असताना महापालिकेची तारेवरची कसरत होत आहे. त्यातच शहराच्या विविध भागात मोठ्याप्रमाणात बांधकाम सुरू आहेत, तेथे नव्याने लोकवस्ती होऊन पाणी पुरवठ्याची मागणी पालिकेकडे केली जात आहे.
पण पाण्याची मागणी वाढल्याने उन्हाळ्यात नवे पाण्याचे जोड देऊ नये, जून अखेरीनंतर पावसाला सुरवात होईल, त्यावेळी नवे जोड देण्याबाबत विचार करावा अशी चर्चा पाणी पुरवठा विभागात सुरू आहे. यापूर्वीही मार्च ते जून या चार महिन्यात नवे जोड दिले जात नव्हते, त्यामुळे त्याची अंमलबजावणी करता येईल अशी बैठकीत चर्चा झाली आहे. या बैठकीत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अधिकार, अभियंता उपस्थित होते. पुढील महिनाभर नळ जोड देऊ नये यासाठी प्रत्येक विभागाच्या प्रमुखास परिपत्रक पाठविले जाणार असल्याची चर्चा आहे.
याबाबत पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत आत्ताच कोणताही निर्णय झालेला नाही असे सांगितले. पुढील दोन महिन्यांसाठीचा प्रश्न असला तरी कायदेशीरबाबी तपासल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
शहरातील पाणी पुरवठ्याची सद्यस्थिती
धरणातील पाणीसाठा - ९.९१ टीएमसी
शहरातील रोजचा पाण्याचा वापर - १६०० एमएलडी
एका महिन्यातील टँकरच्या फेऱ्या - ३००००
Web Title: Ban New Plumbing Summer Large Increase Demand Water
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..