अमरावती : टिशू कल्चर रोपांची मागणी ९० टक्क्यांनी घटली

अमरावती : टिशू कल्चर रोपांची मागणी ९० टक्क्यांनी घटली
Published on: 

केळीच्या टिशू कल्चर रोपांची
मागणी ९० टक्क्यांनी घटली

किमतीतही २५ टक्क्यांची घसरण

ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती : पाण्याची टंचाई आणि सिंचनाच्या अनिश्चिततेमुळे यंदा केळी लागवडीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. टिशू कल्चर रोपांची मागणी तब्बल ९० टक्क्यांनी घटली असून, रोपांच्या किमतीतही २५ टक्क्यांची घसरण झाली आहे.

चांगला बाजारभाव आणि फळबाग लागवडीसाठी मिळणारे अनुदान यामुळे केळीकडे वळलेल्या शेतकऱ्यांनी आता पाण्याची उपलब्धता पाहूनच लागवडीचा निर्णय घेतला आहे. प्रारंभी केळीला प्रतिकिलो १५ रुपये दर मिळत असल्याने शेतकरी पावसाळ्यापूर्वीच टिशू कल्चर रोपांची नोंदणी करीत होते.

गतवर्षी पथ्रोट गावाच्या परिसरात सुमारे दोन लाख रोपांचा पुरवठा झाला होता. यंदा मात्र ही संख्या अवघ्या तीन हजारांवर आली आहे. रोपांची मागणी घटल्याने उत्पादक कंपन्यांनाही दर कमी करावे लागले आहेत. गतवर्षी १७ रुपये प्रतिनग दराने रोपांची बुकिंग होत होती. यंदा त्यात २५ टक्क्यांची कपात झाली आहे.

मागील वर्षी रोपांची आगाऊ नोंदणी करूनही वेळेवर रोपे मिळत नव्हती. यंदा मात्र मागणीअभावी रोपांचा साठा उपलब्ध आहे. एका खासगी टिशू कल्चर कंपनीचे क्षेत्र व्यवस्थापक अनिल माकोडे यांच्या माहितीनुसार, मागील वर्षी मराठवाड्यात ७८ लाख रोपांचा पुरवठा झाला होता. यंदा केवळ ६० ते ७० हजार रोपांची नोंदणी झाली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कंपनीने रोपांच्या किमतीत २५ टक्के सवलत दिली आहे. योग्य पाण्याचे नियोजन असलेल्या शेतकऱ्यांनी एक ते दोन हजार रोपांची लागवड केल्यास केळीला प्रतिक्विंटल २,५०० ते ३,२०० रुपये दर मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

---- चौकट ---
बाजारभावाची माहिती मिळणेही कठीण
बऱ्हाणपूर येथील बाजारभावाच्या आधारे अंजनगावसुर्जी तालुक्यातील पांढरी येथून दररोज केळीचे दर जाहीर केले जात होते. मात्र, व्यापाऱ्यांनी दरफलक लावण्याबाबत पुढाकार न घेतल्याने ही अनेक वर्षांची परंपरा बंद पडली आहे. परिणामी, विक्रीच्या वेळी योग्य दराचा अंदाज घेणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.