पाऊस नसतानाही भरले 11 बंधारे

Bandhara
Bandhara

मोरगाव (पुणे) : बारामती तालुक्‍याचा जिरायती भाग आणि पुरंदर तालुक्‍याचा पूर्व भाग यांच्यासाठी नाझरे जलाशय एक वरदान आहे. या पट्ट्यात दमदार पावसाने हजेरी लावली नसली तरी नाझरे धरणाच्या सांडव्यातून पडणाऱ्या अतिरिक्त पाण्यातून कऱ्हेवरील अकरा बंधारे भरले आहेत. कोल्हापुरी आणि वसंत (सिमेंट) बंधाऱ्यांवर नाझरे जलाशयाची कृपा झाली असल्याने त्या पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
 
बारामतीचा जिरायती पट्टा जवळपास शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी नाझरे जलाशयावर अवलंबून आहे. मोरगाव हद्दीपर्यंत पाणी पोचले असले तरी अद्याप कऱ्हा नदीपात्रातील गणेश कुंड आणि मोरगाव-सुपा रस्त्यावरील मोठा कोल्हापुरी बंधारा आजही कोरडा आहे. मात्र, नाझरेपासून आंबी-मोरगावच्या सीमेपर्यंतचे बंधारे भरत आले आहेत. यामध्ये पुरंदर तालुक्‍यातील सात तर बारामती तालुक्‍यातील चार बंधाऱ्यांचा समावेश आहे.

बारामती तालुक्‍याच्या हद्दीतील जगतापवस्ती, माळवाडी, धरणवस्ती, चव्हाणवस्ती येथील बंधारे नाझऱ्याच्या पाण्याने भरले आहेत. तर पुरंदर तालुक्‍यातील अर्जुनघाट, रामकृष्ण विहीर, अण्णा मारुती विहीर, जुना विठ्ठलवाडी, राणेवस्ती, चिकटाई, गिरजाई हे बंधारे पाण्याने भरले आहेत. गेल्या दहा वर्षांत प्रथमच नाझरे शंभर टक्के भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे गेली दहा वर्षे कऱ्हामाई रीती होती. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम निसटला असला तरी या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिके व पशुधनासाठी चारा यासाठी निश्‍चित होणार आहे. सासवडवरून नाझरे धरणात येणारा पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे नाझऱ्याच्या सांडव्यावरूनही कऱ्हा नदीत येणारा पाण्याचा वेग अतिशय कमी झाला आहे.

पाझर तलाव भरण्याची मागणी
आजही बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी पशुधन जगविण्यासाठी सरकारी चाऱ्यावर अवलंबून आहेत. पशुधन जगविण्यासाठी शेतात चारापिके घेणे गरजेचे आहे. नाझरे धरणातून मोठे पाझर तलाव आणि बंधारे भरून दिल्यास शेतकऱ्यांना पशुधन जगविण्यासाठी शाश्वत आधार मिळणार आहे. कऱ्हा नदीवरील बंधारे व बारामतीच्या जिरायती भागातील पाझर तलाव संबंधित विभागाने शंभर टक्के भरून द्यावेत, अशी मागणी या पट्ट्यातील ग्रामपंचायतींनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com