#PuneMandai ‘स्मार्ट’ बाणेरमधील मंडई रोगराईचे केंद्र

अमर सदाशिव शैला 
गुरुवार, 21 जून 2018

पुणे - बाणेर भागात महापालिकेकडून बांधण्यात आलेली मंडई मागील सात वर्षांपासून बंद आहे. ही मंडई म्हणजे पावसाचे पाणी साचून त्यातून परिसरात साथीचे आजार पसरण्याचे केंद्र निर्माण झाले आहे. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांची भाजी खरेदीची सोय होण्याऐवजी त्यांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झाला आहे.

पुणे - बाणेर भागात महापालिकेकडून बांधण्यात आलेली मंडई मागील सात वर्षांपासून बंद आहे. ही मंडई म्हणजे पावसाचे पाणी साचून त्यातून परिसरात साथीचे आजार पसरण्याचे केंद्र निर्माण झाले आहे. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांची भाजी खरेदीची सोय होण्याऐवजी त्यांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झाला आहे.

एकीकडे स्मार्ट बाणेर करण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना नागरिकांना, मात्र मंडई नसल्याने रस्त्याच्या कडेलाच भाजी खरेदी करावी लागत आहे. बाणेर येथील गंगूबाई जाधव भाजी मंडईचे उद्‌घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते २०११ मध्ये झाले. सध्या महापालिकेचे या मंडईकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. या मंडईतील गाळेवाटपाला राजकीय वादातून विलंब झाला आहे. मंडईची इमारत दुमजली असून, तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था आहे. 

मंडईच्या पार्किंगमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या ठिकाणी झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात आली आहेत. मंडईत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची पैदास होऊन डेंगीचे रुग्ण वाढत आहेत. मंडई शेजारी असणाऱ्या निरामय सोसायटीमध्ये मागील वर्षी डेंगीचे सहा रुग्ण सापडले होते. पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी सोय करण्यात आलेली नसल्यामुळे या वर्षीसुद्धा डेंगीची साथ पसरण्याची शक्‍यता आहे. पहिल्या पावसानंतर येथे पाणी साचण्यास सुरवात झालेली आहे. मात्र अद्यापही महापालिकेतर्फे येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही. 
दरवर्षी भाजी मंडईच्या पार्किंगमध्ये पाणी साठते. महापालिकेत तक्रार केल्यानंतर औषध फवारणी केली जाते. मात्र पंधरा दिवसांनंतर पुन्हा डासांचा त्रास सुरू होतो. यावर महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना करावी. 
- गौरव स्वर्णकार, अध्यक्ष, निरामय सोसायटी   

ओळखपत्र असणाऱ्या पथारीवाल्यांना गाळे देण्यात यावेत, ही आमची मागणी आहे. त्यानंतर राहिलेल्या गाळ्यांचे गरजू पथारीव्याल्यांमध्ये वितरण व्हावे. मात्र येथील स्थानिक लोकप्रतिनिधींना जवळच्या लोकांना मंडईत गाळे द्यायचे आहेत.  
- बाळासाहेब मोरे, सरचिटणीस, पथारी पंचायत 

बाणेर भागातील पथारीवाले - १५०
ओळखपत्रधारक पथारीवाले - ७२

Web Title: baner mandai Center of Pandemic sickness health care