
बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी अभिजित पवार यांना आज सर्वप्रथम लसीकरण करण्यात आले.
बारामती : कोरोना लसीकरणाचा आजपासून बारामतीत प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी जवळपास 107 आरोग्य कर्मचा-यांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
आज सकाळी महिला शासकीय रुग्णलयामध्ये उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, तहसिलदार विजय पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, मुख्याधिकारी किरणराज यादव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्या उपस्थितीत लसीकरणास प्रारंभ झाला.
पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी अभिजित पवार यांना आज सर्वप्रथम लसीकरण करण्यात आले. दरम्यान वरिष्ठ पातळीवरुन जी यादी येईल, त्यानुसार लसीकरण केले जाणार आहे, यादीत कसलाही बदल करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर नसल्याने ज्यांची नावे यादीत ज्या दिवशी येतील, त्यांनाच लस दिली जाणार असल्याचेही डॉ. खोमणे यांनी स्पष्ट केले. बारामतीतील महिला ग्रामीण रुग्णालय व सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण होईल.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
बारामती तालुक्यातील 1278 शासकीय व 2200 खाजगी वैद्यकीय कर्मचा-यांनी कोविड अँपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. या सर्व कर्मचा-यांचे लसीकरण केले जाणार आहे. दुस-या टप्प्यात पोलिसांसह होमगार्ड, नगरपालिकेचे कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना लस दिली जाईल. तिस-या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह मधुमेह, रक्तदाब व इतर व्याधी असलेल्या रुग्णांना लस दिली जाणार आहे. लसीकरण केल्यानंतर कर्मचा-यांना निरिक्षणाखाली ठेवले जाणार असून काही त्रास झाल्यास प्राथमिक उपचाराचीही तयारी करण्यात आली आहे.
चार तासात लस संपवावी लागणार
या लसीची बाटली एकदा उघडल्यानंतर चार तासात ती संपवावी लागेल, जर त्यात लस शिल्लक राहिली तरी चार तासानंतर तिचा वापर करायचा नाही, असे बंधन घालण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एका बाटलीतून दहा जणांना लसीकरण केले जाणार आहे.