रोममध्ये घुमणार बारामतीच्या संशोधनाचा आवाज

रोममध्ये घुमणार बारामतीच्या संशोधनाचा आवाज
Published on

रोममध्ये घुमणार बारामतीच्या संशोधनाचा आवाज
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या ‘एआय’ची जागतिक पातळीवर दखल
बारामती, ता. १८ : एकेकाळी शेतीतील प्रयोग, शिक्षण आणि संशोधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या बारामतीचा आवाज आता थेट जगाच्या व्यासपीठावर घुमणार आहे. बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित संशोधनाची दखल संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) घेतली असून, इटलीतील रोम येथे होणाऱ्या जागतिक परिषदेसाठी ट्रस्टच्या संशोधनाची निवड करण्यात आली आहे.
रोम येथे १ ते ३ जुलै दरम्यान होणाऱ्या ‘स्मार्ट फार्मिंग : शाश्वत कृषी-अन्न प्रणालींसाठी डेटा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील कृषी तज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. या परिषदेत बारामतीच्या संशोधनाचा अनुभव जगासमोर मांडला जाणार आहे. विशेष म्हणजे, हे संशोधन केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतातील अडचणी सोडविण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता, पीक व्यवस्थापन, रोगनियंत्रण आणि उत्पादनवाढ यांसारख्या आव्हानांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने उपाय शोधण्याचे काम ट्रस्टने केले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
परिषदेसाठी ट्रस्टचे विश्वस्त व ‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आणि प्रकल्प समन्वयक डॉ. योगेश फाटके यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून बारामतीतील संशोधनाची माहिती जगभरातील तज्ज्ञांपर्यंत पोहोचणार आहे. रोम येथील एफएओच्या मुख्यालयात होणाऱ्या या परिषदेत स्मार्ट शेतीचा जागतिक विस्तार, डेटा व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, युवक आणि महिला उद्योजकतेला चालना, तसेच लहान शेतकऱ्यांसाठी शाश्वत आणि परवडणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास या विषयांवर चर्चा होणार आहे. कृषी क्षेत्र अधिक कार्यक्षम आणि हवामान बदलाला तोंड देण्यास सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रतापराव पवार यांच्या पुढाकारातून ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मागील चार वर्षांपासून ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या सहकार्याने कृषी क्षेत्रातील एआयच्या वापरावर व्यापक संशोधन केले आहे. या संशोधनातील नावीन्यपूर्ण आणि शेतकरीकेंद्री कामाची दखल घेत एफएओच्या तज्ज्ञ समितीने ट्रस्टला विशेष निमंत्रण दिले आहे.
गेल्या पाच दशकांहून अधिक काळ ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने शिक्षण, संशोधन आणि कृषी विकास क्षेत्रात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. डेमो प्लॉट, संशोधन केंद्रे, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि एआय आधारित प्रयोगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भविष्यातील शेतीसाठी सक्षम करण्याचे काम ट्रस्ट सातत्याने करत आहे. त्यामुळेच आज बारामतीचे संशोधन रोमच्या जागतिक व्यासपीठावर पोहोचले आहे. ट्रस्टच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार तसेच इतर विश्वस्तांसह ऑक्सफर्ड व मायक्रोसॉफ्टच्या तज्ज्ञांनीही ट्रस्टच्या संशोधन कार्याचे अभिनंदन केले आहे.

ऑक्सफर्ड, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या जागतिक संस्थांच्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम आम्ही करत आहोत. जगातील उत्तम संशोधन आणि नवतंत्रज्ञान स्थानिक परिस्थितीनुसार शेतकरी व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, याला आमचे प्राधान्य आहे.
- प्रतापराव पवार, अध्यक्ष, ‘सकाळ’ माध्यम समूह तथा विश्वस्त, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट

जागतिक दर्जाच्या कृषी संशोधनासाठी ट्रस्ट नेहमीच अग्रेसर राहिला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अन्न व कृषी संघटनेने कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेवरील संशोधनाची दखल घेणे अभिमानास्पद आहे. भविष्यातील कृषी संकटांना सामोरे जाण्यासाठी अशा संशोधनाची गरज असून, आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य वाढविण्यास आमचे प्राधान्य राहील.
- राजेंद्र पवार, अध्यक्ष, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट

फोटो ओळ :
रोम (इटली) : संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अन्न व कृषी संघटनेची (एफएओ) इमारत.

15220

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com