शेती व्यवस्था भक्कम होण्यास ‘कृषिक’ची मदत
माळेगाव, ता.१७ : ‘‘बारामतीमधील कृषिक प्रदर्शनाचे हे अकरावे वर्ष आहे. बदलत्या जगाची बदलती शेती प्रत्यक्ष दाखविणारा हा उपक्रम आहे. यात नैसर्गिक शेतीपासून ते एआयपर्यंतचा होत असलेला प्रवास शेतकरी प्रत्यक्ष पाहू शकतात. अशा उपक्रमांमुळे राज्याची शेती व्यवस्था भक्कम होण्यास मदत होते. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांनी प्रदर्शन बघायला हवे,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित बारामती कृषी विज्ञान केंद्रात आयोजित या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पीक उत्पादनाच्या नव्या पद्धती, आधुनिक तंत्र व संशोधनामुळे बदलत असलेली देशविदेशातील शेती आणि त्याचे लाभ दाखविण्यासाठी तब्बल १३० एकरवर साकारलेली भव्य प्रक्षेत्रे, अशी वैशिष्ट्ये असलेल्या ‘कृषिक-२०२६’ प्रदर्शनाला आजपासून बारामती-माळेगावात शानदारपणे सुरुवात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिक उपक्रमाची तोंड भरून स्तुती केली.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार व ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, नाबार्डच्या मुख्य महाव्यवस्थापिका रश्मी दराड तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, एआय तंत्रावर आधारित दोनशे टनापर्यंत उत्पादन देणारा ऊस शेती, नैसर्गिक शेती, हायड्रोफोनिक भाजीपाला तंत्रज्ञान, विदेशी फुलशेती व भाजीपाला शेती, रोबोटिक तणनियंत्रण, कृषी यंत्रे व अवजारे, प्रक्रिया उद्योग, सूक्ष्म सिंचन, पशुधन, दुग्धविकास, कृषी व्यवस्थेतील वित्तपुरवठा, कृषी शिक्षण व संशोधन अशा अनेक विषयांची सखोल माहिती देणारी दालनं ‘कृषिक’मध्ये साकारण्यात आलेली आहेत.
‘एआय’ शेतीतंत्राची पवार यांनी घेतली माहिती
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार तसेच सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष व अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी संयुक्तपणे ‘कृषिक’मधील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्र आधारित पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली. पारंपरिक पद्धत व एआय पद्धत यातून उत्पादित होणाऱ्या पिकांमधील फरक त्यांनी बारकाईने जाणून घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार जयंत पाटील, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील व इतर शास्त्रज्ञ उपस्थित होते.
03046
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

