

बारामती, ता. १९ : विमानतळाजवळ उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर रविवारी (ता. १९) झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर पोलिसांची विविध पथके शोधमोहीम राबवित असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी पहाटे गुन्हा दाखल केला असून लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी (रा. सणसर, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
बारामती विमानतळाजवळ रविवारी संध्याकाळी एका धाब्याजवळ राणा यांच्यावर सुरुवातीला पिस्तुलातून गोळी मारली गेली, त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्यावर जॅकेटधारी मास्क घातलेल्या अज्ञात हल्लेखोराने हल्ला केला. यात त्यांच्या उजव्या हाताच्या दंडाला व पोटाच्या उजव्या बाजूला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर पुण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बारामती पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळी तपास करण्यात आला आहे. राणा यांना वाय दर्जाची सुरक्षा असताना ती सुरक्षा त्यांनी बाजूला का ठेवली, हे हल्लेखोर नेमके कोण होते, हल्ल्यामागचे प्रमुख कारण काय असावे या व इतर अनेक बाबींचा तपास पोलिसांनी वेगाने सुरू केलेला आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामतीतील या हल्ल्याची गांभीर्याने दखल घेत पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणी तातडीने गुन्हेगारांना गजाआड करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी अधीक्षकांना दिल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्या पातळीवर सीसीटीव्ही कॅमेरे तपासणे, नाकाबंदी, संशयित लोकांची तपासणी, तांत्रिक विश्लेषण यासह इतरही अनेक मुद्द्यांवर विविध पथकांकडून तपास सुरू आहे. स्वत: पोलिस अधीक्षक तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक या घटनेच्या तपासावर लक्ष केंद्रीत करत आहेत.
या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन गुन्हेगारांना तातडीने अटक होईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, यासाठी आम्ही ठामपणे पाठपुरावा करू. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.
- सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.