
बारामती : श्रीमंत बाबूजी नाईक वाड्याचे काम आकर्षक व्हायला हवे
बारामती : शहरातील श्रीमंत बाबूजी नाईक वाड्याचे बांधकाम दर्जेदार करून परिसर सुशोभित करावा, येथील बुरुज, नगारखान्याचे काम अधिक आकर्षक व्हावे, वाड्याचे संवर्धन करताना अंतर्गत परिसर स्वच्छता ठेवावा, परिसरात अतिक्रमण असल्यास ते काढावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. 29) अधिका-यांना दिले.
बारामती परिसरात सुरु असणाऱ्या विविध विकासकामांची अजित पवार यांनी पाहणी केली. यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, संभाजी होळकर, सचिन सातव आदी उपस्थित होते.
श्री. पवार यांनी यांनी आज बारामती शहरातील बाबूजी नाईक वाडा, एस. टी. स्टँड, आमराई येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत व शासकीय विश्रामगृह इत्यादी ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. महाहौसिंग मुंबई यांच्याकडून आमराई येथे 276 सदनिका व 29 व्यावसायिक गाळे बांधण्याचे काम सुरु आहे.
आमराई वसाहतीतील 175 कुटुंबांचे स्थलांतर करावे म्हणजे बांधकाम करतांना अडचण येणार नाही. एस. टी. स्टँडच्या इमारतीवर सोलर पॅनल उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. विविध ठिकाणी सुरु असलेली विकास कामे चांगल्या दर्जाची आणि वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान बारामती शहरातील वाहतूक आराखड्याचा व्यवस्थित अभ्यास करुन पुढील दौ-याच्या वेळेस त्याचे सादरीकरण करण्याचे निर्देश अजित पवार यांनी आज अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते व मुख्याधिकारी महेश रोकडे यांना दिले आहेत. त्या नुसार या बाबत चर्चा होऊन या आराखड्याची अंमलबजावणी लवकरच होईल, अशी शक्यता आहे.
Web Title: Baramati Ajit Pawar Work Shrimant Babuji Naik Wadya Attractive
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..