
Baramati Bank of Baroda Manager Death : बारामतीमधून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे कामाच्या जास्त ताणामुळे एका बँकेच्या व्यवस्थापकाने चक्क बँकेतच गळफास लावून आत्महत्या केली आहे. मृत बँक व्यवस्थापकाचे नाव शिवशंकर मित्रा असं आहे.
शिवशंकर मित्रा हे बारामतीतील भिगवण रोड येथील बँक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापक होते. काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. पतर, प्राप्त माहितीनुसार शिवशंकर मित्रा हे ११ जुलै रोजी तब्येत बरी नसल्याने आणि कामाचा ताण असल्याचे सांगून बँकेच्या मुख्य व्यवस्थापक पदाचा राजीनामा दिला होता आणि आता ते त्यांचा नोटीस कालावधी पूर्ण करत होते. बँकेच्या कामकाजाचे तास संपल्यानंतर, मित्रा यांनी सर्व कर्मचाऱ्यांना बँक बंद करण्यास सांगून निघून जाण्यास सांगितले होते.
प्राप्त माहितीनुसार, बँकेचा सुरक्षा रक्षक रात्री साडेनऊ वाजता निघून गेला होता. याआधी मित्रा यांनी एका सहकाऱ्यास दोरी आणण्यास सांगितले होते. साधारण रात्री १० वाजेनंतर त्यांनी फाशी लावून घेतली. ही घटना बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
इकडे शिवशंकर मित्रा हे घरी परतले नाही आणि त्यांनी फोनही उचलला नाही, म्हणून त्यांची पत्नी मध्यरात्रीच्या सुमारास बँकेत पोहोचली. तेव्हा तिला बँकेतील लाईट सुरू असल्याचे दिसले. मात्र आवाज देवूनही आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. अखेर नंतर बँक उघडण्यात आल्यानंतर शिवशंकर मित्रा यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले.
तर घटनास्थळावरून मिळालेल्या चिठ्ठीत बँक व्यवस्थापक शिवशंकर यांनी कामाचा ताण हे पाऊल उचलण्याचे कारण असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत असेही लिहिले आहे की, कर्मचारी त्यांच्या १०० टक्के काम करतात, त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त दबाव टाकू नका. तसेच, मी माझ्या संपूर्ण विचाराअंती हे पाऊल उचलत आहे. याशिवाय त्यांनी असंही लिहिले आहे की, शक्य असल्यास त्यांचे डोळे दान करावेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.