

बारामती, ता. २२ : सूर्यनगरी परिसरातून चोरीला गेलेली बुलेट अवघ्या काही तासांत शोधून काढण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
दीपक गुलाब बंडगर (रा. सूर्यनगरी) यांची बुलेट (एमएच ४२ एयू ४३४४) बुधवारी (ता. १७) पहाटे घराच्या पार्किंगमधून चोरीला गेली होती. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला. समीर विलास लोंढे (वय २०, रा. मलठण, ता. दौंड) व मयूर विकास बनकर (वय २०, रा. श्रीरामनगर, बारामती) यांनी ही चोरी केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
भिगवण रोडवरील वनविभागाच्या परिसरात सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चोरीची बुलेट मिळून आली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, सुरेंद्र वाघ, रामदास जाधव, पोलिस हवालदार रचना काळे, भारती खंडागळे, पोलिस शिपाई नीलेश वाकळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.