इन्स्टाग्रामवर कोयत्यासह फोटो ठेवला; पोलिसांनी केली कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

'कोयता' या शब्दाला पोलिसांनी आता चांगलेच गांभीर्याने घेतले आहे. बारामतीतील एका युवकाला इन्स्टाग्रामवर कोयत्यासह फोटो ठेवणे चांगलेच महागात पडले.

Baramati Crime : इन्स्टाग्रामवर कोयत्यासह फोटो ठेवला; पोलिसांनी केली कारवाई

बारामती - 'कोयता' या शब्दाला पोलिसांनी आता चांगलेच गांभीर्याने घेतले आहे. बारामतीतील एका युवकाला इन्स्टाग्रामवर कोयत्यासह फोटो ठेवणे चांगलेच महागात पडले. पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनाच मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी बारामती शहर पोलिसांना या बाबत तातडीने कारवाईचे आदेश दिले.

अर्पित मोहिते किंग ऑफ बारामती या इन्स्टाग्राम पेजवर कोयत्यासह एका युवकाचा फोटो दिसल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षकांना मिळाली होती. त्यांनी संबंधितावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी सूचना दिल्या.

पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील फौजदार युवराज घोडके, पोलीस अंमलदार दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, दशरथ इंगवले, आकाश सीताप, शाहू राणे यांनी इंस्टाग्राम वर कोयत्यासह आपला फोटो ठेवणाऱ्या युवकाचा शोध घेतला.

अर्पित सचिन मोहिते (वय 22, रा. बारामती) याच्याकडे चौकशी केली असता हौस म्हणून त्याने चार वर्षांपूर्वी काढलेला कोयत्या सोबतचा फोटो क्रेझ म्हणून स्वतःच्या इन्स्टाग्रामवर ठेवला होता. पोलिसांनी त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 4 ,25 प्रमाणे कारवाई केली, घरातील कोयताही जप्त केला. सदरची पोस्ट डिलीट केली.

सर्वांनी जपून सोशल मिडीया वापरा....

या पुढील काळात सोशल मिडीयावर पोलिस बारकाईने लक्ष ठेवणार असून कोणाच्याही डीपी किंवा स्टेटस किंवा इतर कोठेही गुन्हेगारी संबंधित मजकूर, हत्यारांबाबतच्या पोस्ट, खुन्नस सारखे शब्दप्रयोग असतील तर त्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.